घरIPL 2020IPL 2020 : सूर्यकुमार यादवला भारतीय संघात संधी मिळावी - पठाण 

IPL 2020 : सूर्यकुमार यादवला भारतीय संघात संधी मिळावी – पठाण 

Subscribe

सूर्यकुमार आयपीएल, तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.  

मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. त्याने या सामन्यात ४७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावांची खेळी केली. ही त्याची आयपीएल स्पर्धेतील सर्वोच्च खेळी ठरली. सूर्यकुमार मागील काही वर्षे आयपीएल स्पर्धा, तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्याने मागील वर्षीच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ११ सामन्यांत ३९२ धावा केल्या होत्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता. तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मात्र, तो अजून भारताकडून खेळलेला नाही. परंतु, आता तो ज्या फॉर्मात आहे, ते पाहता, त्याला भारतीय संघात संधी मिळाली पाहिजे, असे भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणला वाटते.

- Advertisement -

सूर्यकुमार अप्रतिम फॉर्मात

पठाणने सूर्यकुमार यादवविषयी ट्विट केले. ‘सूर्यकुमार यादव अप्रतिम फॉर्मात आहे. आता त्याला भारतीय संघात संधी न मिळाल्यास मला खूप निराशा होईल. तो फारच उत्कृष्ट खेळाडू आहे,’ असे पठाणने ट्विटमध्ये लिहिले. तसेच भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रालाही सूर्यकुमार आता भारताकडून टी-२० क्रिकेट खेळला पाहिजे असे वाटत आहे. सूर्यकुमारने स्थानिक टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १५५ सामन्यांत ५३२६ धावा केल्या आहेत. त्याने या धावा ३२ ची सरासरी आणि १४० च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. मागील वर्षी त्याची भारत ‘अ’ संघात निवड झाली होती. आता त्याने आयपीएलमध्ये कामगिरीत सातत्य राखल्यास त्याच्यासाठी भारतीय संघाची दारे खुली होऊ शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -