नॅपोलीकडून ज्युव्हेंटस पराभूत

सीरिया ए फुटबॉल स्पर्धा

स्टार खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डोने सलग आठव्या सामन्यात गोल करुन त्याचा संघ ज्युव्हेंटसला पराभवाचा धक्का बसला. इटलीतील फुटबॉल स्पर्धा सीरिया एच्या सामन्यात नॅपोलीने ज्युव्हेंटसवर २-१ अशी मात केली. मागील सलग आठ वर्षे सीरिया ए स्पर्धा जिंकणार्‍या ज्युव्हेंटसचा हा यंदाच्या मोसमातील केवळ दुसराच पराभव होता. २१ सामन्यांनंतर ज्युव्हेंटसचे ५१ गुण असून ते सीरिया एच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहेत, तर नॅपोलीचा संघ २७ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या, पण दोघांनाही गोल करता आले नाहीत. त्यामुळे सामन्याच्या मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. मात्र, उत्तरार्धात नॅपोलीने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. याचा फायदा त्यांना ६३ व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा पिटर झिलिंस्कीने गोल करत नॅपोलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

तर कर्णधार लॉरेंझो इंसिग्ने ८६ व्या मिनिटाला गोल करत नॅपोलीची आघाडी दुप्पट केली. यानंतर ज्युव्हेंटसने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ९० व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल करत नॅपोलीची आघाडी १-२ अशी कमी केली. मात्र, ज्युव्हेंटसला आणखी गोल करण्यात अपयश आले.