टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी सुरूवातीपासूनच निराशाजनक झाली आहे. भारतीय संघाला आपल्या पहिल्या दोन्हीही सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भारतीय संघावर अनेक माध्यमातून टीका टिप्पणी होत असतानाच सोशल मीडियावर आयपीएल बंद झाली पाहिजे अशा चर्चा रंगल्या आहेत. यातच सोशल मीडियावर हॅशटॅग Banipl हा ट्रेंड तयार झाला आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर चांगलाच भडकला. त्याने टीकाकारांना खडेबोल सुनावले आहेत. आयपीएलमधून नव्या खेळाडूंना चमकता येते, खेळाडूंचा सराव होतो, त्यामुळे आयपीएलचा आणि याचा संबध काय असा प्रश्न त्याने केला.
टीकाकारांना सुनावताना गंभीरने म्हटले की, कोणीही आयपीएलला चुकीचे ठरवू शकत नाही. प्रत्येकजण आयपीएलबाबत वाईट बोलत असेल तर हे बरोबर नाही. जे सत्य आहे ते मान्य करावे लागेल. दोन-तीन संघ आपल्यापेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. हे आपण जेवढ्या लवकर मान्य करू तेवढे आपल्यासाठी फायदेशीर असेल, असे गैतम गंभीर याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. “न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात भारतीय फलंदाज दबावात असल्याचे जाणवले. याचा आयपीएलशी काहीही संबध नाही. २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पण असे पहायला मिळाले होते. कारण त्यावेळी पण आयपीएल नंतर काही दिवसातच भारतीय संघाने विश्वकप खेळला होता. त्यामुळे आयपीएल महत्त्वाची आहे. आयपीएलमुळे खेळांडूना पर्याप्त सराव करायला मिळतो. त्यामुळे आयपीएलला दोष देण्यात अर्थ नाही, असे गंभीरने म्हटले.
सलग दोन पराभवामुळे भारतीय संघावर विविध टिका टिप्पणी होत आहेत. सोबतच भारतीय संघातील खेळाडूंवर आक्षेपार्ह बोलले जात आहे. भारतीय संघाचा दोन्ही सामन्यांत दारूण पराभव झाला होता. त्यामुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग जवळपास संपुष्टात आला आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर पुढील तीनही सामन्यांत मोठ्या विजयाची गरज आहे. भारताचे अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलँड सोबत पुढील सामने होणार आहेत.