T20 world cup 2021: रागात बॅटवर मारला पंच अन् हात मोडला; न्यूझीलंडच्या खेळाडूची हिटविकेट

न्यूझीलंडचा खेळाडू डेव्हिड कॉनवे हाताच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर गेला आहे

टी-२० विश्वचषकाचा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आला असून रविवारी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये फायनल होणार आहे. तत्पुर्वी न्यूझीलंडच्या संघासाठी एक धक्क्याची बाब समोर आली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवेला इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्या सामन्यात त्याने ४७ धावांची महत्त्वाची खेळी केली होती. त्याची दुखापत जास्त असल्यामुळे तो फायनलचा सामना खेळणार नाही. तर १७ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंडच्या टी-२० आणि कसोटी सामन्यांसाठीही तो संघात नसणार आहे. त्यामुळे आगामी महत्त्वाचे सामने लक्षात घेता न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका बसला आहे.

उजव्या हाताला झाली दुखापत

इंग्लंडविरूध्दच्या सामन्यात बाद झाल्यानंतर डेवॉन कॉनवेने रागात बॅटवर उजव्या हाताने मारले. त्यानंतर त्याच्या हाताला दुखापत झाली होती. नंतर स्कॅन केल्यावर त्याच्या उजव्या हात फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. हा चालू विश्वचषकातील न्यूझीलंडला दुसरा झटका बसला आहे याच्या अगोदर लॉकी फर्ग्युसनला पण दुखापतीमुळे बाहेर जावे लागले होते.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी म्हटले की, “कॉनवे न्यूझीलंडच्या संघासोबत खेळायला खूप उत्सुक होता. तो संघातून बाहेर गेल्याने संघातील सर्वजण नाराज आहेत. आम्ही आमच्या खेळाडूंना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करत आहोत. कॉनवेने बाद झाल्यानंतर जे केले ते करायची गरज नव्हती. तो संघातील प्रमुख खेळाडू आहे आणि आम्हाला त्याच्याबाबत दु:ख आहे. आता आमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून त्याचा फायनलच्या सामन्यात संघात समावेश करू शकत नाही. आम्ही भारताविरूध्द होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याच्या पुनरागमनाबद्दल विचार करू”.

कॉनवेने सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात ६ सामन्यांत १०८.४० च्या सरासरीनुसार १२९ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने इंग्लंडविरूध्दच्या सामन्यांत शानदार फलंदाजी केली होती. इंग्लंडने दिलेल्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने १९ षटकांतच पूर्ण केला. त्या सामन्यात कॉनवेने डेरिल मिचेल सोबत भागीदारी करून महत्त्वाची खेळी केली होती.


हे ही वाचा: Video: Aus vs Pak दोन टप्प्यावर वॉर्नरच्या सिक्सरवर गौतम गंभीर भडकला, म्हणाला…