घरक्रीडाटी-२० वर्ल्डकप लांबणीवर, आयपीएलसाठी?

टी-२० वर्ल्डकप लांबणीवर, आयपीएलसाठी?

Subscribe

यंदा ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत टी-२० वर्ल्डकप पार पडणार होता. परंतु, ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने आयसीसीला ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली. आयसीसीच्या निर्णयानंतर बीसीसीआयसाठी आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे बीसीसीआयच्या दबावाला आयसीसी बळी पडले का? आयपीएल ही 'स्थानिक' स्पर्धा, टी-२० वर्ल्डकप या 'जागतिक' स्पर्धेपेक्षा महत्त्वाची आहे का? कोरोनाच्या कारणास्तव वर्ल्डकप होऊ शकत नसेल, तर आयपीएल कसे होऊ शकते?, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.      

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा यंदा होणार का? कधी? कुठे? कशी? असे असंख्य प्रश्न चाहत्यांना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय), आठ फ्रेंचायझींना पडले होते. मात्र, काही दिवसांत होणाऱ्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीआधीच यापैकी काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. यंदाचे आयपीएल १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार असल्याचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यंदाचे आयपीएल भारतामध्ये आयोजित करणे शक्य होणारच नव्हते. अखेर या स्पर्धेसाठी युएईला पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे खासकरून बीसीसीआयने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, हे सगळे शक्य झाले तरी कसे?

आयपीएलच्या यंदाच्या म्हणजेच तेराव्या मोसमाला मार्चच्या अखेरीस सुरुवात होणार होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वत्र लॉकडाऊन झाले आणि ही स्पर्धा स्थगित करण्यावाचून बीसीसीआयपुढे पर्याय उरला नाही. आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआयला सर्वाधिक महसूल मिळतो. यंदा ही स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयचे साधारण ४००० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकले असते असा अंदाज आहे. त्यामुळे ते काहीही करून ही स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यासाठी ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्डकप लांबणीवर पडणे गरजेचे होते.

- Advertisement -

यंदा ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत टी-२० वर्ल्डकप पार पडणार होता. बऱ्याच महिन्यांपासून ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल असे म्हटले जात होते. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) घाईने कोणताही निर्णय घेणे टाळले. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले, तसेच आणखीही काही नियम अधिक कडक करण्यात आले. त्यातच व्हिक्टोरियामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने ऑस्ट्रेलियन सरकारला तिथे पुन्हा लॉकडाऊन करण्यावाचून गत्यंतर नव्हता. या परिस्थितीत १६ संघांना ऑस्ट्रेलियात आणणे, त्यांना क्वारंटाईन करणे, त्याच वेळी त्यांना सरावासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हे सर्व क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अवघड जाणार होते. त्यामुळे त्यांनी आयसीसीला पत्र लिहीत ही स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केली. परंतु, त्यानंतरही आयसीसीने काही काळ वाट पाहिली. अखेर ऑस्ट्रेलियातील परिस्थिती सुधारत नसल्याने त्यांना टी-२० वर्ल्डकप पुढे ढकलावाच लागला.

आयसीसीच्या निर्णयानंतर बीसीसीआयसाठी आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली क्रिकेट संघटना! त्यामुळे आयसीसीच्या निर्णयावर काही जणांनी (खासकरून भारत आणि बीसीसीआय विरोधकांनी) शंका उपस्थित केली. बीसीसीआयच्या दबावाला आयसीसी बळी पडले का? आयपीएल ही ‘स्थानिक’ स्पर्धा टी-२० वर्ल्डकप या ‘जागतिक’ स्पर्धेपेक्षा महत्त्वाची आहे का? कोरोनाच्या कारणास्तव वर्ल्डकप होऊ शकत नसेल, तर आयपीएल कसे होऊ शकते?, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. मात्र, “आम्ही सर्व पर्यायांचा विचार करूनच हा निर्णय घेतला. आम्हाला वर्ल्डकप सुरक्षित वातावरणात घ्यायचा आहे. तसेच आम्ही हा निर्णय घेतल्यामुळे इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांना अधिक स्पष्टता मिळेल आणि ते त्यानुसार पुढील वेळापत्रक आखू शकतील,” असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू सॉनी म्हणाले.

- Advertisement -

त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही काहींच्या शंकांचे निरसन झाले नाहीच. बीसीसीआयला मात्र याची फारशी चिंता नव्हती. त्यांनी आयपीएलच्या योजना आखण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या स्पर्धेला २६ सप्टेंबरपासून प्रारंभ होईल असे म्हटले जात होते. परंतु, भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परिणाम होऊ नये यासाठी या स्पर्धेची तारीख एका आठवडा आधी म्हणजे १९ सप्टेंबर पक्की करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिवाळीपर्यंत (१४ नोव्हेंबर) चालावी असे प्रसारण करणाऱ्या वाहिनीचे म्हणणे होते. मात्र, अंतिम सामना ८ नोव्हेंबरलाच होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. तसेच ही स्पर्धा युएईमध्ये होणार हे सुद्धा निश्चित आहे. आता काही दिवसांत होणाऱ्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत आणखी काय निर्णय घेतले जातात याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -