T20 world cup 2021: न्यूझीलंड फायनलमध्ये पोहचूनही जेम्स नीशमने टाळले सेलिब्रेशन, म्हणाला…

बुधवारी झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला

बुधवारी झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. शेवटच्या काही षटकांत न्यूझीलंडच्या संघाने केलेल्या शानदार फलंदाजीच्या बदल्यात विश्वविजेत्या इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. जेम्स नीशमने ११ चेंडूत २७ धावा करून सामना न्यूझीलंडच्या नावावर केला यात तीन मोठ्या षटकारांसह एका चौकाराचा समावेश होता. नीशमच्या आक्रमक खेळीमुळे न्यूझीलंडने पहिल्यांदा टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. तर १९ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सलामीवीर डारेल मिशेलने चौकार मारून न्यूझीलंडचा विजय पक्का केला त्यावेळी न्यूझीलंडच्या ड्रेसिंगरूममधील सर्वच खेळाडू जल्लोष करत होते. मात्र या दरम्यान जेम्स नीशम कोणताही जल्लोष न करता शांत बसून राहिला होता.

काम अजून संपले नाही

न्यूझीलंडने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठल्यानंतर सगळेच खेळाडू जल्लोष करत होते. मात्र या दरम्यान जेम्स नीशम त्याच्या जागेवरून शांत बसून होता त्याच्याकडून कोणतीच जल्लोषाची प्रतिक्रिया आली नव्हती. त्याचे हाव-भाव अगदी साधारण होते. नीशमने आनंद न व्यक्त केल्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याने त्याच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, “काम संपले आहे असे मला वाटत नाही”. म्हणजेच नीशमच्या म्हणण्यानुसार त्याचे काम अजून संपले नाही खरा विजय अजून एक पाऊल दूर आहे. केन विलियमसनचा संघ १६ व्या षटकात ४ बाद ११० धावावंर विजयासाठी संघर्ष करत होता. पण डावाच्या १७ व्या षटकांत नीशमने क्रिस जॉर्डनच्या षटकात शानदार फटके मारून २३ धावा केल्या आणि न्यूझीलंडची विजयाकडे कूच केली.

न्यूझीलंड पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये

पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १६६ धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक नाबाद ५१ धावांची खेळी केली. तर डेविड मलानने ४१ आणि जोस बटलरने २९ धावा करून न्यूझीलंडला १६७ धावांचे आव्हान दिले. दुसऱ्या डावात १६७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १ षटक राखून विजय मिळवला. न्यूझीलंडकडून सलामीवीर डारेल मिशेलने सर्वाधिक नाबाद ७२ धावा केल्या. तर कॉन्वे ४६ धावा करून बाद झाला. शेवटच्या काही षटकांत फलंदाजी करायला आलेल्या जेम्स नीशमने अविस्मणीय पारी खेळून संघाला विजय मिळवून दिला. त्याने ११ चेंडूत २७ धांवाची महत्त्वपूर्ण खेळी केली. नीशमच्या या आक्रमक खेळीच्या बदल्यात न्यूझीलंडने पहिल्यांदाच आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला.