तमिम इक्बालची भारत दौर्‍यातून माघार

कायेसची बांगलादेश टी-२० संघात निवड

tamim

बांगलादेशचा अनुभवी सलामीवीर तमिम इक्बालने आगामी भारत दौर्‍यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पत्नी लवकरच त्यांच्या दुसर्‍या मुलाला जन्म देणार असल्याने त्याने भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) त्याच्या जागी डावखुरा सलामीवीर इम्रुल कायेसची टी-२० संघात निवड केली आहे. भारत व बांगलादेश यांच्यात तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना ३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे.

एका क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, तमिम दुखापतीतून सावरत आहे. त्याची टी-२० संघात निवड झाली होती. त्यानंतर होणार्‍या कसोटी मालिकेतील २२ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे होणार्‍या दुसर्‍या सामन्याला आपल्याला मुकावे लागू शकेल, असे तमिमने आधी बीसीबीला कळवले होते. मात्र, आता त्याने भारत दौर्‍यातून माघार घेत पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पत्नी लवकरच त्यांच्या दुसर्‍या मुलाला जन्म देणार आहे.

तमिमला मागील काही काळात फारशा धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे त्याने काही काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याने जवळपास तीन महिन्यांपूर्वी आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

बांगलादेश टी-२० संघ : शाकिब-अल-हसन (कर्णधार), लिटन दास, सौम्या सरकार, मोहम्मद नईम, मुशफिकूर रहीम, मोहमदुल्लाह, अफिफ हुसेन, मोसादेक हुसेन, अमिनुल इस्लाम, अराफत सनी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमीन हुसेन, मुस्तफिझूर रहमान, शफीउल इस्लाम, इम्रुल कायेस.