पहिल्याच वनडे सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिलाच वनडे सामना खेळवण्यात आला. यामध्ये भारताने १० विकेट्स राखत झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केल्यामुळे पहिल्या डावात झिम्बाब्वेच्या संघाला १८९ धावांवर रोखता आले. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

झिम्बाब्वेच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या शिखर धवन आणि शुभमन गिल या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. या खेळीत शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. धवनने ९ चौकारांच्या जोरावर नाबाद ८१ धावा केल्या. तर गिलने १० चौकार आणि एका षट्काराच्या जोरावर नाबाद ८२ धावांची खेळी साकारली.

दीपक चहरने आज उत्कृष्ट गोलंदाजी केली. चहरने ३, सिराज ने १ विकेट घेत झिम्बाब्वे संघावर दबाव कायम ठेवला. १५ षटकानंतर झिम्बाब्वेचा स्कोअर ४ बाद ५८ धावा इतका होता. तर २५ षटकानंतर झिम्बाब्वेचा स्कोअर ६ बाद ९५ धावा इतका होता.

भारताचा कर्णधार लोकेश राहुलने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली. सामन्याच्या पहिल्या ५ षटकांमध्ये झिम्बाब्वेला नाबाद २३ धावा बनवण्यात यश आले. मात्र सहाव्या षटकापासून भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेचा धुव्वा उडवण्यास सुरुवात केली.


हेही वाचा : ठरलं! आता तब्बल अडीच महिने रंगणार आयपीएलचा थरार, जाणून घ्या टीम इंडियाचं शेड्युल