घरक्रीडाटीम इंडिया केवळ कोहली, बुमराहवर अवलंबून नाही!

टीम इंडिया केवळ कोहली, बुमराहवर अवलंबून नाही!

Subscribe

प्रशिक्षक शास्त्रींचे वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनात मागील काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताचा संघ जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर, तर एकदिवसीय क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे. फलंदाजीत कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, मयांक अगरवाल, श्रेयस अय्यर यांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केले आहे. तसेच गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ केवळ कोहली किंवा बुमराहवर अवलंबून नाही, असे विधान भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले.

भारतीय संघ यशस्वी होण्यासाठी केवळ विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराह किंवा रोहित शर्मावर अवलंबून नाही. संघातील अकरावा खेळाडू असो की पंधरावा, आमच्या यशात संघातील सर्वच खेळाडू योगदान देतात. खेळ उंचवा आणि चांगली कामगिरी करा, यावर आमचा विश्वास आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उमेश आणि शमीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. अखेरच्या कसोटीत शाहबाझला (नदीम) संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. तो स्थानिक क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे दमदार कामगिरी करत आहे. त्याने ४०० हूनही अधिक विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे त्याला यश मिळाल्याने संपूर्ण संघ खुश होता, असे शास्त्री एका मुलाखतीत म्हणाले.

- Advertisement -

तसेच या मालिकेत पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळताना मालिकावीराचा पुरस्कार मिळवणार्‍या रोहित शर्माविषयी शास्त्री यांनी सांगितले, रोहितने या मालिकेत केलेल्या कामगिरीचे कौतुक करावे तितके कमी आहे. रोहितसारख्या खेळाडूचा जेव्हा आत्मविश्वास वाढतो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघावर आपोआपच दडपण येते. गेल्या काही वर्षांपासून आम्ही रोहितला कसोटीत सलामीवीर म्हणून खेळवण्याचा विचार करत होतो. त्याने अखेर सलामी करण्यास होकार दिलाच.

धोनीचा अपमान करणे बंद करा!

- Advertisement -

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. त्याने अजून निवृत्तीही घेतलेली नाही. मात्र, धोनीने आता निवृत्त झाले पाहिजे, असे मत अनेक लोक व्यक्त करत आहेत. याबाबत रवी शास्त्री म्हणाले, धोनीबद्दल जे लोक बोलत आहेत, त्यापैकी अर्ध्यांना त्यांच्या बुटाच्या नाड्याही बांधता येत नसतील. धोनीने देशासाठी किती उत्कृष्ट कामगिरी केली आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मग त्याला निवृत्त करण्याची घाई कशासाठी? धोनी लवकरच निवृत्त होईल, हे त्याला आणि त्याला जे लोक ओळखतात त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्याच्याविषयी भाष्य करत राहणे हा त्याचा अनादर करण्यासारखे आहे. भारतासाठी १५ वर्षे खेळल्यानंतर, त्याला काय केले पाहिजे हे कळत नसेल का? धोनीने त्याला पाहिजे तेव्हा निवृत्त होण्याचा हक्क मिळवला आहे. त्यामुळे त्याच्याविषयी चर्चा आता बंद झाली पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -