Homeक्रीडाBumrah : देशासाठी खेळणे थांबवा अन्...; ऑस्ट्रेलियाविरोधात पराभवानंतर माजी क्रिकेटपटूचा संताप

Bumrah : देशासाठी खेळणे थांबवा अन्…; ऑस्ट्रेलियाविरोधात पराभवानंतर माजी क्रिकेटपटूचा संताप

Subscribe

नवी दिल्ली : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023 – 2025 (WTC 2023 – 2025) मधून भारतीय संघ बाहेर पडला असून आता चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. नुकतेच आस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3 – 1 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. त्याआधी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतदेखील सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे WTC 2023 – 2025 च्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर पडला. त्यामुळे असंख्य क्रिकेटप्रेमींचे स्वप्न भंगले. पण याचसोबत आता भारतीय संघाला अनेक टीकाकारांचा सामना करावा लागत आहे. भारताच्या माजी ज्येष्ठ खेळाडूंनीही संघावर टीका केली आहे. (Team India ex cricketer on current team india perfomance in test cricket)

हेही वाचा : ICC Test Ranking : पाकिस्तानच्या पराभवाचा भारतीय संघाला फटका; क्रमवारीत घसरण 

पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली. त्यानंतर तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. यावरून 1983 मध्ये भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या माजी क्रिकेटपटू बलविंदर संधू यांनी त्याचे कान टोचले आहेत. ते म्हणाले की, “आता खेळाच्या तणावाबद्दल चर्चा होते. पूर्वीच्यावेळी जलदगती गोलंदाज यापेक्षा अधिक गोलंदाजी करत होते.” असे म्हणत त्यांनी टोला लगावला. ते यावेळी म्हणाले की, “बूमराहने 150 च्या आसपास अशी किती षटके टाकली? पण किती डावात? त्याने 5 सामन्यांच्या 9 डावांमध्ये एवढी गोलंदाजी केली आहे. तसे पाहायला गेले तर, प्रत्येक डावात त्याने अंदाजे 16 षटके किंवा प्रत्येक सामन्यात अंदाजे 30 षटके टाकली आहेत. विशेष म्हणजे त्याने सतत गोलंदाजी केली नाही. त्याने वेगवेगळ्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली आहे. त्यामुळे ‘वर्कलोड मॅनेजमेंट’ हे मूर्खपणाचे असून हा ऑस्ट्रेलियन शब्द आहे. मला हे निरुपयोगी गोष्ट वाटते.” अशा शब्दात सुनावले आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना माजी क्रिकेटपटू बलविंदर संधू म्हणाले की, “आम्ही अशा काळात खेळलो की, जिथे क्रिकेटपटू त्यांच्या शरीराचे ऐकायचे आणि इतर कोणाचे नाही. मला या सर्व गोष्टी निरुपयोगी वाटतात. एका दिवसात 15 षटके टाकणे आणि तेही वेगवेगळ्या स्पेलमध्ये, ही गोलंदाजांसाठी मोठी गोष्ट नाही. बुमराहने ती षटके 3 ते 4 स्पेलमध्ये टाकली. सध्याच्या काळात खेळाडूंकडे सर्वोत्तम फिजिओ, सर्वोत्तम मसाज करणारे आणि सर्वोत्तम डॉक्टर आहेत, जे तुमच्या शरीराची सर्वोत्तम काळजी घेऊ शकतात. जर एखादा गोलंदाज एका डावात 20 षटकेही टाकू शकत नसेल तर त्याने भारताकडून खेळणे विसरले पाहिजे. आम्ही दिवसातून 25-30 षटके टाकत होतो. कपिल देव यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मोठे स्पेल टाकले आहेत.” असे म्हणत त्यांनी जसप्रीत बूमराहला झापले आहे.