घरक्रीडाटीम इंडियाला पाकिस्तान संघ घाबरतो!

टीम इंडियाला पाकिस्तान संघ घाबरतो!

Subscribe

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात विराट कोहलीच्या भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा डकवर्थ-लुईस नियमानुसार पराभव केला. या विजयामुळे भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची आपली विजयी मालिका सुरू ठेवली. या दोन संघांमध्ये विश्वचषकात एकूण ७ सामने झाले असून, सर्व सामने भारतानेच जिंकले आहेत. या सामन्यातही भारतीय संघाने आपले वर्चस्व प्रस्थापित करत अगदी सहजपणे विजय मिळवला. या सामन्याच्या सुरुवातीपासून पाकिस्तानचा संघ जिंकेल असे वाटलेच नाही, कारण हा संघ भारताला घाबरतो, असे मत पाकिस्तानचे महान गोलंदाज आणि माजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी व्यक्त केले.

मागील काही वर्षांत भारत आणि पाकिस्तान या संघांमधील तफावत वाढली आहे. याचा प्रत्यत रविवारी ओल्ड ट्रॅफोर्ड येथे झालेल्या सामन्यातही आला. पाकिस्तानचा संघ फक्त प्रतिभेवर अवलंबून आहे, तर भारतीय संघात प्रतिभेसोबतच एकीही आहे. ते एक संघ म्हणून खेळतात. भारताच्या प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका माहीत असते आणि ते दिलेली भूमिका चोख पार पाडतात. १९९० च्या काळात आमचा संघ फारच उत्कृष्ट होता. मात्र, आताचा पाकिस्तान संघ भारतीय संघाला घाबरतो. पाकिस्तानी खेळाडू सामना सुरू होण्याआधीच दबावाखाली येतात आणि त्यामुळे हा संघ दुबळा होतो. पाकिस्तानला बर्‍याच गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सर्वात आधी त्यांनी भारतीय खेळाडूंप्रमाणे फिट होणे गरजेचे आहे, असे वकार म्हणाले.

- Advertisement -

मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. सर्फराजच्या निर्णयाबाबत वकार म्हणाले, नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा सर्फराजचा निर्णय चुकीचाच होता, खासकरून जेव्हा तुमच्या संघात दोन फिरकीपटू असतात! मात्र, या निर्णयापेक्षाही गोलंदाजांचे या सामन्यातील प्रदर्शन निराशाजनक होते. त्यांना योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यात अपयश आले आणि भारतीय फलंदाजांनी याचा फायदा घेतला. भारताकडे उत्कृष्ट फलंदाज आहेत. ते गोलंदाजाने खराब चेंडू टाकण्याची वाट पाहतात, पण पाकिस्तानविरुद्ध त्यांना धावांसाठी फार मेहनत करावी लागली नाही. एकट्या मोहम्मद आमिरने चांगली गोलंदाजी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -