टी-20 विश्वचषकात भारतीय संघ खेळणार नव्या जर्सीत

आशिया चषकातील पराभवानंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने नुकताच टी-20 विश्वचषकासाठी खेळणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यानंतर आता भारतीय संघाच्या जर्सीबाबतही महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय संघ टी-20 विश्वचषकात नव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत किट भागीदार ‘एमपीएल स्पोर्ट्स’नं एक व्हिडिओ शेअर केला आहे. (team indias kit sponsor mpl sports announced that the men in blue will new jersey in the t20 world cup 2022)

आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी सोमवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता भारतीय संघाच्या नव्या जर्सीबाबत माहिती देण्यात आली. ‘एमपीएल स्पोर्ट्स’नं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा नव्या जर्सीबाबत बोलताना दिसत आहे. मात्र, ही जर्सी कशी असेल, याबाबत माहिती नाही. त्यामुळे भारतीय संघाची जर्सी कशी असेल? याबाबात चाहत्यांमध्ये उस्तुकता लागली आहे. यापूर्वी टीम इंडियाच्या टी-20 संघानं लॉन्च केलेली रेट्रो जर्सी चाहत्यांना खूप आवडली होती.

‘एमपीएल स्पोर्ट्स’नं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या दिसत आहे. या व्हिडिओत “चाहत्यांनीच आम्हाला क्रिकेटर बनवलंय”, असे रोहित शर्मा म्हणतो. “चाहते ज्या प्रकारे खेळाडूंचा उत्साह वाढवतात, त्याच्याशिवाय खेळामध्ये मजा नाही येत”, असे श्रेयस अय्यर म्हणतो. तसेच, “भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा भाग बनण्यासाठी तयार व्हा”, असे हार्दिक पांड्या बोलताना दिसत आहे.

हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी टीम इंडियाची जर्सी कशी असावी? याबाबत सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. काही चाहते आकाशी रंगाच्या जर्सीची मागणी करत आहेत. तर, 2007 च्या विश्वचषकात घालण्यात आलेली जर्सी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या अंगावर पाहायला मिळेल, अशीही चाहत्यांकडून अपेक्षा केली जात आहे.

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या 7 शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जाणार आहेत. तसेच, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.


हेही वाचा – आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ 2 खेळाडूंचे पुनरागमन