घरक्रीडाटीम इंडियाचा ‘पुन्हा’ मालिकाविजय !

टीम इंडियाचा ‘पुन्हा’ मालिकाविजय !

Subscribe

ऑस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडमध्येही भारतीय संघाने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिले ३ सामने जिंकत भारताने या मालिकेत ३-० अशी अजय आघाडी मिळवली आहे. तिसर्‍या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने हा सामना ७ विकेट राखून जिंकला. हा कोहलीचा या दौर्‍यातील शेवटचा सामना होता. यानंतरच्या २ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याने या दौर्‍याचा शेवट मालिका विजयाने केला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच त्यांच्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर कॉलिन मुनरो (७) आणि मार्टिन गप्टिल (१३) झटपट माघारी परतले. मुनरोला मोहम्मद शमीने तर गप्टिलला भुवनेश्वर कुमारने बाद केले. यानंतर कर्णधार केन विल्यम्सनने काही काळ खेळपट्टीवर टिकाव धरला. त्याने संयमाने फलंदाजी केली. पण, युझवेंद्र चहलला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्याचा या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन करणार्‍या हार्दिक पांड्याने अप्रतिम झेल पकडला. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ५९ अशी होती. पुढे रॉस टेलर आणि टॉम लेथम यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी सांभाळून फलंदाजी केली. त्यांनी १-२ धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. दरम्यान, टेलरने केदार जाधवला सलग दोन चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४६ वे अर्धशतक होते.

- Advertisement -

तर, काही षटकांनंतर लेथमनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर लगेचच त्याला चहलने माघारी पाठवले. त्याने आणि टेलरने मिळून चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. पुढे पांड्याने हेन्री निकोल्स (६) आणि मिचेल सॅन्टनर (३) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर, संयमाने खेळत असलेला टेलरही ९३ धावांवर बाद झाला. यानंतर ईश सोधी (१२), डग ब्रेसवेल (१५) आणि ट्रेंट बोल्ट (२) झटपट माघारी परतल्याने न्यूझीलंडचा डाव २४३ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून शमीने सर्वाधिक ३ तर भुवनेश्वर, चहल आणि पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

२४४ धावांचा पाठलाग करणार्‍या भारताची सुरुवात चांगली झाली. शिखर धवनने आक्रमक फलंदाजी करत २७ चेंडूंत २८ धावा केल्या. मात्र, त्याला बोल्टने बाद करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आपली विकेट घेण्याची फारशी संधी दिली नाही. रोहितने ६३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर, कोहलीने आपले अर्धशतक करण्यासाठी ५९ चेंडू घेतले. त्यानंतरही या दोघांनी आपली चांगली फलंदाजी सुरू ठेवली. मात्र, सॅन्टनरच्या गोलंदाजीवर लेथमने रोहितला यष्टिचित केले. रोहितने ७७ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याने आणि कोहलीने दुसर्‍या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. पुढे कोहलीही बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ७४ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या. यानंतर उर्वरित धावा अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिकने करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ३ विकेट घेणार्‍या मोहम्मद शमीला सामनाविराचा पुरस्कार मिळाला. या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी होणार आहे.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड : ४९ षटकांत २४३ (टेलर ९३, लेथम ५१; शमी ३/४१, पांड्या २/४५, भुवनेश्वर २/४६, चहल २/५१) पराभूत वि. भारत ४३ षटकांत ३ बाद २४५ (रोहित ६२, कोहली ६०, रायडू ४०*, कार्तिक ३८*; बोल्ट २/४०).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -