टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरल्याप्रमाणे होण्याची शक्यता!

 क्रिकेट ऑस्ट्रेलियाची माहिती

करोनामुळे यावर्षाच्या अखेरीस होणार्‍या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याबाबत साशंकता निर्माण झाली होती. भारतीय संघ या दौर्‍यात चार कसोटी सामनेही खेळणार आहे. त्यामुळे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, करोनामुळे हा दौरा रद्द होऊ शकेल किंवा पुढे ढकलला जाऊ शकेल अशी चर्चा सुरु होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया सध्या आर्थिक संकटात असल्याने हा दौरा ठरल्याप्रमाणे व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहे. बीसीसीआयही त्यांना पूर्ण सहकार्य आहे. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर येणार याची त्यांना जवळपास खात्री आहे.

सध्याच्या परिस्थितीत काहीही खात्रीने सांगता येत नाही. मात्र, असे असले तरी भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा ठरल्याप्रमाणे होण्याची ९० टक्के संधी आहे. हा दौरा झाला नाही तर मला आश्चर्य वाटेल. या मालिकेतील सामने प्रेक्षकांसह होणार की प्रेक्षकांविना हे आता सांगणे अवघड आहे. पुढील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स म्हणाले.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर न आल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे जवळपास ३०० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया दौरा ठरल्याप्रमाणे व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, अफगाणिस्तान संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया एक कसोटी सामना खेळणार आहे, पण क्रिकेट ऑस्ट्रेलिया या मालिकेसाठी फारसे उत्सुक नाही. तसेच यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.