केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाचा आणि खेळांमधील उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी सर्वोच्च मानाचा समजला जाणारा द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार दिपाली देशपांडे यांना जाहीर झाला आहे.प्रशिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी आणि खेळाडूंना त्यांच्या निवडलेल्या खेळात सर्वोच्च आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यास सक्षम करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
कोण आहेत दीपाली देशपांडे ?
दीपाली देशपांडे या भारतीय प्रशिक्षक आणि माजी क्रीडा नेमबाज आहेत. त्यांनी 2004 च्या क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत रायफल नेमबाजीत रौप्य पदक जिंकले.देशपांडे यांनी त्यांच्या संपूर्ण क्रीडा कारकिर्दीत भारतीय नेमबाजी महासंघाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.
ऑलिम्पिक नेमबाज ते भारताच्या सीनियर नेमबाजी संघाची प्रमुख प्रशिक्षक असा यशस्वी प्रवास महाराष्ट्राच्या दीपाली देशपांडेने केला आहे. 2012 मध्ये भारताच्या ज्युनियर नेमबाजांच्या तयारीसाठी कार्यक्रम आखण्यात आला, तेव्हापासून दीपाली ज्युनियर्सच्या जडणघडणीत प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. याच ज्युनियर्सच्या कार्यक्रमातून तयार झालेल्या अनेक खेळाडूंनी सीनियर गटात पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्यासोबत दीपालीकडेही ही प्रशिक्षकपदाची नवी आणि आव्हानात्मक जबाबदारी आली आहे. त्या ज्युनियर्स संघासोबतच सीनियर्स खेळाडूंनाही प्रशिक्षण देत आहेत.
2024 मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या स्वप्नील कुसाळे या खेळाडूच्या त्या प्रशिक्षक होत्या. विशेष बाब ही की स्वप्नील कुसाळेला यावर्षीचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
पदावरून उतार होण्याची आली होती वेळ :
टोकियो ऑलिपिंकमध्ये मोठ्या अपेक्षा असतानाही भारताचा नेमबाज संघ रिकाम्या हाताने परतल्यावर राष्ट्रीय पातळीवरच्या एक प्रमुख प्रशिक्षक असणाऱ्या दीपाली यांना पदावरुन बाजूला व्हावे लागले होते.
पॅरिस ऑलिपिंक्स आधी भारतीय नेमबाजांना पदकापर्यंत जाण्याची संधी 2012च्या लंडन ऑलिपिंकमध्ये मिळाली होती. त्यानंतर सलग दोन ऑलिपिंक खेळांत भारतीय नेमबाजांना पदक मिळालं नाही.
2020 सालच्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय नेमबाजांना यश मिळेल असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. तेव्हा दीपाली राष्ट्रीय प्रशिक्षक होत्या.
टोकियोत असामाधानकारक कामगिरीमुळे त्यांच्यावर भरपूर टीका झाली होती आणि त्यांना आपलं पद गमवावं लागलं होतं.
त्या सांगतात, “तो माझ्या नेमबाजीच्या प्रवासातला सर्वांत वाईट काळ होता, एक खेळाडू म्हणून आणि एक प्रशिक्षक म्हणूनही तो वाईट काळ होता. पराभव व्हावा असं कोणालाच वाटत नसतं पण काही कारणानं आमचे नेमबाज पदक मिळवू शकले नाही. आणि मी अनेक बळीच्या बकऱ्यांपैकी एक ठरले.”
“टोकियोमधल्या अनुभवानं मी आतून कोसळले होते. मला अतीव दुःख झालं होतं. माझ्या पतीने मला पुन्हा माझी गाडी रुळावर आणण्यासाठी मदत केली. यामुळे मला ऊर्जा मिळाली. त्यानंतर मी टोकियो ऑलिंपिकवर अतिविचार करणं सोडलं आणि पॅरिस ऑलिपिंकवर लक्ष केंद्रित केलं.”
हेही वाचा : Armaan Malik : प्रसिद्ध गायकाने गुपचूप उरकलं लग्न, फोटो केले शेअर
Edited By – Tanvi Gundaye