शिवप्रेरणा, समर्थ मंडळाची आगेकूच

ठाणे जिल्हा निवड चाचणी कबड्डी

शिवप्रेरणा मंडळ, फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स, समर्थ क्रीडा मंडळ यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित ६४व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या स्थानिक पुरुष द्वितीय श्रेणी गटाची तिसरी फेरी गाठली. द्वितीय श्रेणी पुरुषांच्या दुसर्‍या फेरीत दहिगावच्या शिवप्रेरणा मंडळाने चुरशीच्या लढतीत बदलापूरच्या जय शिव मंडळाला २५-२४ असे पराभूत केले.

आकाश मसणे, विशाल शेलार यांच्या आक्रमक खेळामुळे शिवप्रेरणाने पहिल्या डावाच्या अखेरीस १६-८ अशी भक्कम आघाडी घेतली होती. दुसर्‍या डावात जय शिवच्या केवल राऊत आणि ओंकार गायकवाड यांच्या खेळामुळे जय शिवने शिवप्रेरणाला चांगलेच झुंजवले. मात्र, शिवप्रेरणाला एका गुणाने हा सामना जिंकण्यात यश आले.

केवणीच्या फ्रेंड सर्कल स्पोर्ट्सने ठाण्याच्या साई एकविरा मंडळाला २३-११ असे नमवत आगेकूच केली. त्यांच्या या विजयात महेश आणि तनय पाटील चमकले. समर्थ क्रीडा मंडळाने केवणीच्या सिद्धिविनायक मंडळावर ३९-२० अशी मात केली. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच अप्रतिम खेळ करत समर्थने मध्यंतराला १९-७ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्या या विजयात वैभव पवार आणि गणेश शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नेवाळीच्या आई गावदेवी मंडळाने अंबरनाथच्या विजय मंडळाला २४-२१ असे, तर नागेश्वर हेल्थ स्पोर्ट्सने शिवशंकरला १८-१५ असे पराभूत केले.

पुरुष व्यावसायिक गटाच्या दुसर्‍या फेरीतील सामन्यात रिंकी मंडप डेकोरेटर्सने जय अँड वीर इंटरप्रायझेसचा २४-२१ असा पराभव करत आगेकूच केली. कल्पेश नाईक, सोजन नाईक इंटरप्रायझेसकडून, तर राजेश पाटील, विकेश म्हात्रे डेकोरेटर्सकडून चांगले खेळले.