Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाThane : कबड्डी स्पर्धेत केदारनाथ क्रीडा मंडळ संघ विजयी

Thane : कबड्डी स्पर्धेत केदारनाथ क्रीडा मंडळ संघ विजयी

Subscribe

तरुण मंडळ उचाटचा ३८ वा क्रीडा महोत्सव संपन्न

ठाणे । तरुणांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरता ‘तरुण मंडळ उचाट’ हे सतत आपल्या कोयना पुनर्वसन उचाट गावी सतत समाजोपयोगी कार्यक्रम घेत असते, यामुळे यंदा गावातील दिवंगत आधार स्तंभांच्या स्मरणार्थ ३८ वे कबड्डी क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये केदारनाथ क्रीडा मंडळ कोयनावेळे संघाने अंतिम सामन्यात वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी संघाशी चुरशीची झुंज देत विजय पटकाविला. वाडा तालुक्यात कोयना पुनर्वसन उचाट या गावी मागील कित्येक वर्षे या ठिकाणी युवकांकरीता समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात. समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेत २२ संघानी सहभाग घेतला होता, यामध्ये आपल्या बहारदार खेळाचे प्रदर्शन करीत क्रीडा रसिकांची मने जिंकली. उपांत्य फेरीमध्ये वाघजाई कोळकेवाडी संघाने प्रतिस्पर्धी कळकवणे क्रीडा मंडळास पराभूत केले. केदारनाथ कोयनावेळे संघाने प्रतिस्पर्धी कादवड क्रीडा मंडळास पराभूत करीत अंतिम फेरीत दाखल झाले. अंतिम सामन्यात केदारनाथ संघाने बहारदार बचाव करीत मध्यंतरापर्यत ५ गुणांची महत्वाची आघाडी घेत सामन्यात रंगत आणली. दुसर्‍या सत्रात पवन मोरे, ओमकार कदम, निखिल, किरण, विपुल यांच्या बहारदार खेळाने आघाडी १० पर्यंत वाढविण्यात केदारनाथ यशस्वी झाला. वाघजाई कोळकेवाडी संघाच्या आदित्य शिंदे, श्रीपाद कुंभार यांनी यशस्वी सुपर टॅकल करीत सामन्यात पुन्हा रंगत आणली पण अंतिम सामन्यात चढाईपट्टू आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात कमी पडल्याने वाघजाई संघाला उपविजेपदावर समाधान मानावे लागले. तर केदारनाथ क्रीडा संघाने चढाई आणि सर्वोत्तम बचावाच्या जोरावर समाजस्तरीय स्पर्धेतील सलग दुसर्‍या अंतिम विजेतेपदाला गवसणी घातली.

केदारनाथ क्रीडा मंडळाच्या ओमकार कदम यांनी सर्वोत्तम खेळाडु तर वाघजाईच्या साईराज कुंभार सर्वोत्तम चढाईपटू, प्रोस्टार आदित्य शिंदे सर्वोत्तम पक्कडपटू होण्याचा मान पटकवला. या समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये तरुण मंडळ उचाटचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र मोरे, विजय मोरे, चंद्रकांत मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मोरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश मोरे (राष्ट्रपती पदक प्राप्त), राजेंद्र मोरे, अजय जाधव, निलेश मोरे, दिनेश मोरे, आशिष मोरे, संतोष जाधव, राकेश मोरे यांनी तसेच कार्यकर्ते पदाधिकारी आणि गावातील ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेऊन कबड्डी स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू सुशील ब्रीद, रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव मोरे, ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोरे, अरुण शिंदे उपस्थित होते.