घरक्रीडाएक सुज्ञ, नावीन्यपूर्ण निर्णय!

एक सुज्ञ, नावीन्यपूर्ण निर्णय!

Subscribe

भारतीय क्रीडा रसिकांसाठी आणि खासकरून नेमबाजांसाठी एक महत्त्वाची बातमी मंगळवारी प्रसिद्ध झाली आहे. २०२२ मध्ये होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धांत नेमबाजीचा (आणि तिरंदाजीचाही) समावेश करण्यात येणार आहे आणि या खेळांच्या स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचाच भाग म्हणून घेतल्या जातील. त्यामुळे अंतिम पदकतालिकेत या खेळांत मिळवलेल्या पदकांचा समावेश त्याच्या पदकसंख्येत करण्यात येईल आणि अर्थातच अंतिम क्रमवारीमध्ये भारताला त्याचा मोठा फायदा होईल. कारण नेमबाजीने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताला भरपूर पदके मिळवून दिली आहेत.

काही महिन्यांपूर्वी अशी बातमी प्रसिद्ध झाली होती की २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये नेमबाजी आणि तिरंदाजीचा समावेश करण्यात येणार नाही. भारतीय क्रीडा रसिकांमध्ये यामुळे मोठीच खळबळ माजली होती. कारण राष्ट्रकुल स्पर्धांतील नेमबाजी स्पर्धा म्हणजे भारताच्या पदकसंख्येत मोठी भर घालणारी स्पर्धा होती. नेमबाज यामुळे खूपच निराश आणि अस्वस्थ झाले होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तर नेमबाजी नसल्यास आम्ही राष्ट्रकुल स्पर्धांवर बहिष्कार घालू असे स्पष्टपणे सांगितले होते. भारत हा राष्ट्रकुल स्पर्धांतल्या बड्या देशांपैकी एक. त्यामुळे आयोजकही अस्वस्थ झाले होते.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने, गेल्या वर्षअखेर, ३० डिसेंबरला, आपल्याला या स्पर्धांमध्ये रस आहे असे सांगून बहिष्काराचा प्रस्ताव मागे घेतला. बर्मिंगहॅमला शक्य होणार नसेल, तर आम्ही या स्पर्धांचे आयोजन भारतात करू असे त्यांनी सांगितले. त्यामुळे चर्चेचा मार्ग मोकळा झाला. त्या प्रस्तावावर २२ व २३ जानेवारीला लंडनमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धा कार्यकारी मंडळाच्या बैठकीत विचार झाला आणि वरीलप्रमाणे निर्णय घेतला गेला. त्यामुळे आता राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांतीलच एक खेळ म्हणून भारतात होतील. अर्थातच पदकतालिकेत त्यांचा समावेश करण्यात येईल आणि ही भारताच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. भारताच्या भूमिकेचा हा विजय आहे असेच म्हणायला हवे.

- Advertisement -

यातील एक महत्त्वाची, तांत्रिक बाब अशी आहे की, राष्ट्रकुल स्पर्धांच्याच भाग असलेल्या नेमबाजी आणि तिरंदाजी या स्पर्धा भारतात होणार असल्या, तरी भारत सह-यजमान नसेल. त्यामुळे त्याला आयोजनासाठी राष्ट्रकुलाकडून निधीही मिळणार नाही. कारण स्पर्धांच्या आधी जाहीर केलेल्या कार्यक्रमानंतर दूरचित्रवाणी प्रक्षेपण हक्क, प्रायोजक, जाहिरातदार इ. चे करार यापूर्वीच झाले आहेत. तसे पाहिले तर एक प्रकारे भारतासाठी ही अनुकूल बाब ठरू शकते. आता आयोजन करताना भारताला दूरचित्रवाणी प्रक्षेपण हक्क, प्रायोजक आणि जाहिरातदार यांच्याबरोबर स्वतंत्र करार करावे लागतील. मात्र, भारतातील चित्रवाणी प्रेक्षकांची संख्या पाहता, मिळणारे सारे उत्पन्नही चांगले असेल आणि तेही भारतालाच मिळेल. भारतातील नेमबाजीची अभिनव बिंद्रा, अंजली भागवत, गगन नारंग, मनू भाकर इ. खेळाडूंमुळे वाढलेली लोकप्रियता आणि अलिकडील काळात नेमबाजांनी मिळवलेले यश यामुळे या स्पर्धांना आणि त्यांच्या प्रक्षेपणाला मोठा प्रेक्षकवर्ग असेल. त्यामुळे जाहिरातदारांची संख्याही मोठी असेल.

नेमबाजी स्पर्धा राष्ट्रकुल स्पर्धांमधून वगळण्याचा निर्णय झाला तेव्हा भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. भारतीय खेळाडू मोठे यश मिळवू लागल्यानेच हा निर्णय घेतला गेला, असे रागाने बोलले जाऊ लागले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा तर म्हणाले की, असे असेल तर मग या राष्ट्रकुल स्पर्धांत सहभागी होण्यात काय अर्थ आहे. मला तर यामुळे गुलामगिरीचीच आठवण होते आहे! सार्‍यांचीच अशी भावना असल्यामुळे नेमबाजीचा समावेश नसला तर भारत राष्ट्रकुल स्पर्धांवर बहिष्कार घालेल, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळेच आयोजक आणि राष्ट्रकुल स्पर्धा समिती काळजीत पडली होती.

- Advertisement -

भारताने बहिष्कार मागे घेऊन या खेळांच्या आयोजनाचा प्रस्ताव दिल्यानंतर मात्र त्यावर गंभीरपणे विचार होऊ झाला आणि दोन स्पर्धा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रकुल स्पर्धांचे प्रमुख अधिकारी (सीईओ) डेव्हिड ग्रेव्हेम्बर्ग यांनी यावेळी सांगितले की, विश्वचषक फुटबॉल स्पर्धेने २००२ मध्ये स्पर्धेसाठी जपान आणि द. कोरिया यांच्या सह-आयोजनाचा निर्णय घेतला होता. २०२६ च्या विश्वचषकासाठी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे सह-आयोजक असतील असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आम्हाला दिशा मिळाली आणि आम्ही दोन स्पर्धांचा निर्णय घेतला. ही काही बहिष्काराच्या धमकीमुळे केलेली तडजोड नाही, तर हा एक नाविन्यपूर्ण निर्णय आहे आणि भविष्यकाळातही अनेकांना या प्रकारचा विचार करता येईल.

या स्पर्धांमुळे खेळाडूंचा हुरूप वाढेल, नवोदितांमध्येही चैतन्य निर्माण होईल. आपण या स्पर्धेत पदके जिंकू शकतो असे त्यांना असे वाटू लागेल आणि ते अधिक जोमाने तयारीला लागतील, असे भारतीय रायफल नेमबाजी असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारताला राष्ट्रकुल स्पर्धांत अनेक पदके मिळवून देणारे रणिंदर सिंग, अव्वल नेमबाज संजीव राजपूत आणि गगन नारंग यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले. भारतीय खेळाडूंनी आता या संधीचा जास्तीत जास्त फायदा उठवावा कारण मायदेशात खेळण्याचा फायदा त्यांना मिळेल. त्याबरोबरच प्रेक्षकांचा मोठाच पाठिंबा त्यांना असणार आहे. त्यामुळे अपेक्षांचे अवाजवी दडपण न घेता ते खेळले, तर चांगले यश मिळवू शकतील असे निश्चितपणे म्हणता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -