लॉर्ड्सवर होणारी अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य

भुवनेश्वर कुमारचे विधान

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लॉर्ड्स मैदान आणि भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे खास नाते आहे. २०१४मध्ये भारताने या मैदानावर जिंकलेल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वरने अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्याने फलंदाजीत दोन डावांत मिळून ८८ धावा आणि गोलंदाजीत ६ विकेट्स मिळवत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो पुन्हा लॉर्ड्सवर खेळण्यासाठी उत्सुक आहे. सध्या इंग्लंडमध्येच सुरु असलेल्या विश्वचषकाची लॉर्ड्सवर होणारी अंतिम फेरी गाठण्याचे त्याचे लक्ष्य आहे.

मी तिथे याआधीही २-३ वेळा खेळलो आहे, पण मला इंग्लंडमध्ये येऊन पुन्हा-पुन्हा खेळायला खूप आवडते. लॉर्ड्सवर होणारी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणे ही गोष्ट खूप खास असेल. मी त्या मैदानावर याआधी चांगले प्रदर्शन केले आहे आणि त्यामुळे मला या मैदानाच्या चांगल्या आठवणी आहेत. आता विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणे हे आमचे लक्ष्य आहे. अंतिम फेरी गाठणे ही गोष्ट फक्त माझ्यासाठीच नाही, तर संपूर्ण संघासाठीच खूप महत्त्वाची असणार आहे, असे भुवनेश्वरने सांगितले.

भारताने विश्वचषकाआधीच्या सराव सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. महेंद्रसिंग धोनी आणि लोकेश राहुलच्या शतकांमुळे भारताने ३५९ धावांचा डोंगर उभारला होता. त्या सामन्याबाबत भुवनेश्वर म्हणाला, आम्हाला जे हवे होते, ते त्या सामन्यात झाले. ३५० धावांचा पाठलाग करणे कोणत्याही संघासाठी अवघड असते. मात्र, मोठी धावसंख्या केल्याचा फायदा गोलंदाजांना मिळतो. ते वेगवेगळे प्रयोग करू शकतात.