घरक्रीडाअंदाज चुकतोय का?

अंदाज चुकतोय का?

Subscribe

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत फिरकीपटूंचा बोलबाला राहील, असा अंदाज अनेक आजी-माजी खेळाडूंसह समीक्षकांनी वर्तवला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनेही विश्वचषकाच्या प्रारंभी इंग्लंडमध्ये फिरकीपटूंचेच वर्चस्व राहील, असे भाकीत केले होते. याला कारणही तसेच होते. इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल ठरतील, असे वाटत होते. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून झालेल्या सर्व सामन्यांच्या तपशीलावर नजर फिरवली तर फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांची कामगिरी अधिक लक्षवेधी दिसून येते.

या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात यजमानांच्या आर्चरपुढे ‘चोकर्स’ द.आफ्रिकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले, तर बेन स्टोक्स आणि प्लंकेटनेही वेगवान मारा करत दोन बळी घेतले. त्यानंतर ट्रेंट ब्रिजवर झालेल्या सामन्यात विंडीजच्या वेगवान मार्याने पाकचे कंबरडे मोडले, तर प्रत्युत्तरात पाकच्या आमिरने विंडीजच्या तिघांना तंबूचा रस्ता दाखवला. द.आफ्रिकेच्याही इंगिडीने ३, तर रबाडाने २ बळी घेत लक्ष वेधले. विश्वचषक सुरू होऊन आता एका आठवड्यानंतर पाकिस्तानचा आमिर पाच बळींसह सर्वाधिक विकेट्स घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. या यादीत ओशेन थॉमस, अँडिल फेहलुक्वायो, क्रिस वोक्स, जेसन होल्डर, जोफ्रा आर्चर, पॅट कमिन्स, मुस्तफिजूर रहेमान, लुंगी इंगिडी, मॅट हेन्री, लॉकी फर्गुसन, वहाब रियाज या सर्व गोलंदाजांनी स्थान पटकावले आहे.

- Advertisement -

यंदाच्या विश्वचषकात द. आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिर (२ सामन्यांत ४ बळी) बर्‍यापैकी यशस्वी ठरला आहे. त्याखालोखाल मोहम्मद नबी, मोईन अली, अ‍ॅडम झम्पा या दोनच फिरकीपटूंना आतापर्यंत काहीशी समाधानकारक कामगिरी करता आली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत या वर्षीचा सर्वात चांगला स्ट्राईक रेट असलेला गोलंदाज रशीद खानसह मुजीब-उर-रहमान, श्रीलंकेचा जीवन मेंडिस, न्यूझीलंडचा मिचेल सँटनर, इंग्लंडचा आदिल रशीद, बांगलादेशचा शाकिब, मेहदी हसन यांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही.

मुख्य म्हणजे, इंग्लंडमध्ये होत असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत अजून एकाही संघाने फिरकीवर विश्वास दाखवल्याचे दिसत नाही. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यात पहिले षटक इम्रान ताहिरला देत फिरकीवर विश्वास दाखवला खरा. मात्र, त्यानंतर पुन्हा वेगवान मार्‍यावरच भर देण्यात आला. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका यांनी या स्पर्धेत एखादाच फिरकीपटू खेळवला आहे. जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजांनाच आतापर्यंत संघात स्थान देण्यात आले आहे, ही बाब आश्चर्यचकीत करणारी आहे.

- Advertisement -

संधीच्या प्रतीक्षेत…

ग्लेन मॅक्सवेल, नेथन लायन, तबरेज शम्सी, रेहमत शहा, धनंजय डी-सिल्वा अशा काही फिरकीपटूंना आतापर्यंत झालेल्या सामन्यांत गोलंदाजीची संधी मिळू शकलेली नाही. भारताचा अद्याप एकही सामना झालेला नाही. बुधवारी होणार्‍या द.आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत किती फिरकीपटूंसह उतरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्य संघांप्रमाणे भारतीय संघही वेगवान मार्‍यालाच पसंती देईल की कुलदीप आणि चहल जोडगोळीला संधी असेल, याकडेही सर्वांच्या नजरा असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -