घरक्रीडामाझ्या काळचे भारतीय फलंदाज फक्त स्वतःसाठी शतके करायचे!

माझ्या काळचे भारतीय फलंदाज फक्त स्वतःसाठी शतके करायचे!

Subscribe

इंझमामची टीका

मी ज्या भारतीय फलंदाजांविरुद्ध खेळलो, ते फक्त स्वतःसाठी शतके करायचे, अशी टीका पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने केली आहे. सध्या करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने आजी-माजी खेळाडू सोशल मीडियावर बरेच अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. नुकतेच इंझमाम आणि रमीझ राजा या पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी रमीझच्या युट्युब चॅनलवर त्यांच्या काळच्या भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये काय फरक होता याबाबत चर्चा केली.

आम्ही जेव्हा भारताविरुद्ध खेळायचो, तेव्हा त्यांची फलंदाजी आमच्यापेक्षा मजबूत वाटायची. मात्र, आमचे फलंदाज ३०-४० धावाही संघासाठी करायचे. याऊलट भारतीय फलंदाजांनी १०० धावा केल्या, तरीही त्या फक्त स्वतःसाठी असायच्या. त्यांना आपल्या विक्रमांची चिंता होती. हा दोन संघांमधील मुख्य फरक होता, असे इंझमाम म्हणाला. १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करण्यार्‍या इंझमामने आपला अखेरचा सामना २००७ मध्ये खेळला.

- Advertisement -

इंझमामने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. खेळाडू चांगली कामगिरी करत नसतानाही इम्रान खान ज्याप्रकारे त्यांना पाठिंबा द्यायचे, त्यामुळे सर्व जण कर्णधार म्हणून त्यांचा आदर करायचे असे इंझमामला वाटते.

इम्रान भाई कर्णधार म्हणून खेळण्याची पद्धत, तंत्र याचा फारसा विचार नाही करायचे. मात्र, खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी केले पाहिजे, हे त्यांना ठाऊक होते. त्यांनी युवा खेळाडूंना खूप पाठिंबा दिला. ज्या खेळाडूंवर त्यांचा विश्वास होता, त्या खेळाडूंना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आणि हेच कर्णधार म्हणून त्यांना खास बनवते, असे इंझमाम म्हणाला.

- Advertisement -

व्हीवविरुद्ध खेळायला आवडले असते!
वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार व्हीव रिचर्ड्स आपल्या आक्रमक शैलीतील फलंदाजीसाठी ओळखले जायचे. त्यांच्याविरुद्ध खेळायला मला आवडले असते, असे इंझमाम म्हणाला. मला व्हीव यांच्यासोबत केवळ एका चॅरिटी सामन्यात खेळण्याची आणि फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मला त्यांच्याविरुद्ध खेळायला आवडले असते. वेगवान गोलंदाजांना बरेच फलंदाज चांगले खेळतात. मात्र, व्हीव वेगवान गोलंदाजांविरुद्ध ज्या आक्रमकतेने फलंदाजी करायचे, तसे मी इतर कोणालाही खेळताना पाहिलेले नाही, असे इंझमाम म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -