घरक्रीडाभारताची टोपी मिळतेय यावर विश्वास नाही बसला!

भारताची टोपी मिळतेय यावर विश्वास नाही बसला!

Subscribe

नवदीप सैनीचे विधान

भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौर्‍याची विजयी सुरुवात केली. फ्लोरिडा, अमेरिका येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने विंडीजवर ४ विकेट राखून विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने ३ बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याला सामन्याआधी भारताची टोपी मिळत आहे आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे यावर विश्वास बसत नव्हता.

पहिल्या टी-२० सामन्यानंतर सैनी म्हणाला, मला सामन्याआधी भारताची टोपी देण्यात आली, तेव्हा मी ज्या दिवसाची आयुष्यभर वाट पाहत होतो, तो दिवस आला आहे यावर विश्वासच बसत नव्हता. देशासाठी खेळण्याचे माझे स्वप्न होते. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केल्याचा आनंद आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच षटकात सैनीने निकोलस पूरन आणि शिमरॉन हेटमायर या विंडीजच्या प्रमुख फलंदाजांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यामुळे त्याला हॅटट्रिक घेण्याची संधी निर्माण झाली होती. याबाबत तो म्हणाला, भारतासाठी पहिला सामना खेळत असल्याने सुरुवातीला माझ्यावर खूप दबाव होता. मात्र, पहिली विकेट घेतल्यावर माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर दुसरी विकेट मिळाल्यावर माझा आत्मविश्वास आणखीच वाढला आणि मला हा सामना इतर कोणत्याही सामन्याप्रमाणेच वाटू लागला. हॅटट्रिकचा चेंडू टाकण्याआधी मी विचार केला की मी इतरांना हॅटट्रिक घेताना पाहिले आहे, पण आता तशी कामगिरी करण्याची संधी आहे. त्यानंतर मी कशी विकेट घेणार याबाबत विचार करत होतो.

सैनीचे भविष्य उज्ज्वल – कोहली

- Advertisement -

भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या टी-२० सामन्यानंतर नवदीप सैनीचे कौतुक केले. नवदीपने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याने आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली. तो अजून परिपूर्ण गोलंदाज नाही, पण त्याच्याकडे चांगला वेग आहे. तो एक असा गोलंदाज आहे, जो सातत्याने १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. इतक्या वेगाने गोलंदाजी करणारे खूप कमी गोलंदाज आहे आणि तो फिट आहे. तो स्वतःसाठी नाव कमवेल आणि यापुढे याहूनही चांगली कामगिरी करेल अशी मला आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -