घरक्रीडाआयपीएलमध्ये पंजाबविरुद्धचा सामना आज

आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धचा सामना आज

Subscribe

आयपीएलमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना होणार आहे. मुंबईसाठी या स्पर्धेची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांनी पहिल्या ३ सामन्यांतील अवघा १ सामना जिंकला होता. यामध्ये पंजाबविरुद्धच्या पराभवाचाही समावेश होता. मात्र, त्यानंतर त्यांनी गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि मागील वर्षी अंतिम फेरी गाठणार्‍या सनरायजर्स हैद्राबादचा पराभव केला. त्यामुळे पंजाबविरुद्धचा हा सामना जिंकत विजयाची हॅटट्रिक करण्याची मुंबईला संधी आहे.

मुंबईने चेन्नईचा मुंबईत पराभव केल्यानंतर त्यांनी आपल्या मागील सामन्यात सनरायजर्स हैद्राबादला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली. या सामन्यात किरॉन पोलार्ड वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. पोलार्डने या सामन्यात २६ चेंडूंतच ४६ धावा केल्या. यंदाच्या मोसमात मुंबईच्या एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे जवळपास प्रत्येक सामन्यात पोलार्ड आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांना अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत मुंबईला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवावे लागले आहे.

- Advertisement -

यंदा सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत मुंबईचा एकही खेळाडू अव्वल २० मध्ये नाही. याउलट मुंबईच्या गोलंदाजांनी यंदाच्या मोसमात खूप चांगली कामगिरी केली आहे. हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात अल्झारी जोसेफच्या रूपात मुंबईला अजून एक अप्रतिम गोलंदाज मिळाला. आपला पहिला आयपीएल सामना खेळणार्‍या जोसेफने १२ धावांतच ६ विकेट घेत आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. त्यामुळे मुंबईने १३६ धावा करूनही हा सामना जिंकला.

पंजाबने आपल्या मागील सामन्यात लोकेश राहुल (७१) आणि मयांक अगरवाल (५५) यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर हैद्राबादचा ६ विकेट राखून पराभव केला. राहुल आणि मयांक या दोघांनी या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. राहुलने ६ सामन्यांत २१७ तर मयांकने ६ सामन्यांत १८४ धावा केल्या आहेत. मुंबई आणि पंजाब यांच्यात या मोसमाच्या सुरुवातीला मोहाली येथे झालेल्या सामन्यात या दोघांच्या चांगल्या फलंदाजीमुळेच मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या सामन्यात मुंबईला त्यांच्यापासून सावध रहावे लागणार आहे.

- Advertisement -

संभाव्य ११ खेळाडू –

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहार, अल्झारी जोसेफ, जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह.

किंग्स इलेव्हन पंजाब : लोकेश राहुल (यष्टीरक्षक), क्रिस गेल, मयांक अगरवाल, डेविड मिलर, सर्फराज खान, मनदीप सिंग, सॅम करन, रविचंद्रन अश्विन (कर्णधार), मोहम्मद शमी, अँड्रु टाय, अंकित राजपूत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -