२०११ विश्वचषकात न खेळल्याचे दुःख – रोहित शर्मा

rohit sharma
रोहित शर्मा

भारतीय संघ सध्या आगामी क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. शनिवारी भारतासमोर सराव सामन्यात न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. भारत हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याने या सराव सामन्यांचे खूप महत्त्व आहे. भारताने याआधी १९८३ आणि २०११ असे दोनवेळा विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे यावेळी भारताला तिसर्‍यांदा विश्वविजेता होण्याची संधी आहे. भारताला जर ही स्पर्धा जिंकायची असेल, तर त्यांच्यासाठी रोहित शर्मा हा खूप महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. रोहितने नुकतीच झालेली आयपीएल स्पर्धा जिंकणार्‍या मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व केले होते आणि आता आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचे त्याचे लक्ष्य आहे. भारताने २०११ साली जिंकलेल्या विश्वचषकासाठी रोहितची निवड होईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. त्या विश्वचषकात खेळायला न मिळाल्याचे मला अजूनही दुःख आहे, असे रोहित म्हणाला.

विश्वचषकात खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. एक क्रिकेटपटू म्हणून सुरुवात करताना विश्वचषकात खेळणे, त्यात खेळणार्‍या संघाचा भाग असणे, विश्वचषक जिंकणे याच गोष्टींचा मीही विचार करायचो. माझेही विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आहे आणि त्यामुळे २०११ विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा भाग नसल्याचे मला अजूनही दुःख आहे. मला त्यावेळी जितके वाईट वाटले होते, तितके वाईट कधीही वाटले नाही, असे रोहित म्हणाला.

सुरुवातीची काही वर्षे चौथ्या क्रमांकावर खेळणार्‍या रोहितने मागील काही वर्षांत सलामीवीर म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र, भारताला चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी रोहितसारखा फलंदाज मिळालेला नाही. त्यामुळे या क्रमांकावर कोण खेळणार हा अजूनही प्रश्न आहे. याबाबत विचारले असता रोहित म्हणाला, आम्हाला याची फार चिंता नाही. माझ्यामते आमच्या संघासाठी अव्वल तीन फलंदाजांची कामगिरी सर्वात महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे विराट (कोहली), शिखर (धवन) आणि माझ्यावर जास्तीत जास्त धावा करण्याची व संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे, जेणेकरून नंतरच्या फलंदाजांवर दबाव येणार नाही.