घरक्रीडामंकीगेट कर्णधार म्हणून माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण!

मंकीगेट कर्णधार म्हणून माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण!

Subscribe

भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अँड्र्यू सायमंड्स यांच्यात २००८ साली झालेले मंकीगेट प्रकरण कर्णधार म्हणून माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण होता, असे विधान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने केले. २००७-०८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना सिडनीत झाला. या सामन्यात हरभजन आणि सायमंड्स यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी हरभजनने सायमंड्सला माकड संबोधल्याचे आरोप करण्यात आले. त्यामुळे हरभजनवर तीन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. ही बंदी मागे घेतली नाही, तर आम्ही दौरा अर्धवट टाकून मायदेशी परतू अशी धमकी भारताने दिली होती. ही बंदी मागे घेतल्यानंतर दौरा पुढे सुरू राहिला.

मंकीगेट प्रकरण कदाचित कर्णधार म्हणून माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण होता. आम्ही २००५ सालची अ‍ॅशेस मालिका गमावली हे स्वीकारणे अवघड गेले होते, पण त्यावेळी परिस्थितीवर माझे नियंत्रण होते. परंतु, मंकीगेट प्रकरणात माझ्या हातात काहीच नव्हते. हे प्रकरण दीर्घकाळ चालले आणि हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण असण्याला हेसुद्धा एक कारण आहे. मंकीगेट प्रकरण दुसर्‍या कसोटीत घडले. मात्र, मला अजूनही आठवते की, अ‍ॅडलेड येथे झालेला चौथा कसोटी सामना संपल्यानंतर मी मैदानाबाहेर येऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. याचे कारण म्हणजे या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी अ‍ॅडलेड कसोटीनंतर होणार होती, असे पॉन्टिंग म्हणाला.

- Advertisement -

तसेच पॉन्टिंगने पुढे सांगितले, या प्रकरणाच्या निकालाने आम्ही निराश होतो आणि याचा परिणाम पुढील कसोटीत आमच्या खेळावर झाला. पर्थ कसोटीत आम्ही भारताचा पराभव करु असे सर्वांना अपेक्षित होते. मात्र, आम्ही तो सामना गमावला. त्यानंतरचे काही दिवस आमच्यासाठी फारच अवघड गेले होते.

त्या कसोटीत बरेच निर्णय भारताच्या विरोधात गेले!
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २००७-०८ मध्ये सिडनी येथे झालेल्या दुसर्‍या कसोटीत स्टिव्ह बकनर आणि मार्क बेन्सन या पंचांनी बरेच निर्णय भारताच्या विरोधात दिले होते, अशी कबुली रिकी पॉन्टिंगने दिली. भारताने हा सामना १२२ धावांनी गमावला होता. पॉन्टिंग या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत होता. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा तेव्हाचा कर्णधार अनिल कुंबळे म्हणाला होता की, या सामन्यात केवळ एकच संघ खिलाडूवृत्तीने खेळला. याबाबत पॉन्टिंगला विचारले असता त्याने सांगितले, अनिल पत्रकार परिषदेत काय बोलला हे आधी मला माहित नव्हते आणि जेव्हा कळले तेव्हा फार आश्चर्य वाटले. त्या सामन्याच्या दुसर्‍या डावात बरेच निर्णय भारताच्या विरोधात गेले होते आणि त्यामुळे त्यांनी सामना गमावला. मात्र, त्यात आमच्या संघाची काही चूक नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -