घरक्रीडासंघ बदलला, जाफर तोच

संघ बदलला, जाफर तोच

Subscribe

सौराष्ट्राविरुद्धचा अंतिम सामना जिंकत विदर्भाने सलग दुसर्‍यांदा रणजी चषकावर आपले नाव कोरले. विदर्भासाठी या मोसमात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मात्र, यातही एका खेळाडूची कामगिरी खूपच खास होती आणि त्या खेळाडूचे नाव आहे वसीम जाफर. ४० वर्षीय जाफरने यंदाच्या मोसमात हजार धावांचा टप्पा ओलांडला. एकाच मोसमात हजार धावांचा टप्पा त्याने कारकिर्दीत दुसर्‍यांदा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा रणजीच्या इतिहासातील तो पहिला फलंदाज आहे. याआधी २००८-०९ मध्ये मुंबईकडून खेळताना जाफरने १० सामन्यांत १२६० धावा केल्या होत्या.

यंदाच्या रणजी मोसमात जाफरने अफलातून प्रदर्शन करताना ११ सामन्यांच्या १५ डावांमध्ये १०३७ धावा काढल्या. या धावा जाफरने ६९.३३ च्या सरासरीने ४ शतके आणि २ अर्धशतकांच्या मदतीने केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती २०६. त्याने ही खेळी उत्तराखंडविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केली होती.

- Advertisement -

मात्र, याच जाफरला दोन वर्षांपूर्वी फारसे संघ संधी देण्यासाठी उत्सुक नव्हते. भारतीय स्थानिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ख्याती असलेल्या जाफरला २०१६-१७ च्या रणजी मोसमात गुढघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्याची आशा नव्हती. त्याला या दुखापतीमुळे बराच वेळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले आणि दुखापतीतून सावरल्यानंतर त्यावेळी ३८ वर्षांचा असणार्‍या जाफरला फारसे संघ संधी देण्यासाठी तयार नसताना मुंबईच्या चंद्रकांत पंडित यांनी विदर्भाचे प्रशिक्षक झाल्यानंतर मुंबईच्याच जाफरला आपल्या संघात खेळण्याची संधी दिली. याचा परिणाम म्हणजे याआधी कधीही रणजी चषक न जिंकणार्‍या विदर्भाने दोन वर्षांत दोन वेळा ही मानाची स्पर्धा जिंकली, तर मुंबईला यावर्षी बाद फेरीही गाठता आली नाही. यावरूनच जाफरचे महत्त्व दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -