विराट कोहली, रोहितमध्ये तुलना होऊ शकत नाही!

ब्रॅड हॉगचे मत

रोहित शर्मा,विराट कोहली

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय संघासाठी वेगवेगळी भूमिका बजावतात. त्यामुळे या दोघांत तुलना होऊ शकत नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले. भारताचा कर्णधार विराट आणि उपकर्णधार रोहित या दोघांची सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा विराट हा जागतिक क्रिकेटमध्ये एकमेव फलंदाज आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकांचा (३) विक्रम सलामीवीर रोहितच्या नावे आहे. तसेच त्याने मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात विक्रमी पाच शतके केली होती.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये या दोघांतील सर्वोत्तम फलंदाज कोण असा प्रश्न एका चाहत्याने हॉगला विचारला. यावर तो म्हणाला, विराट आणि रोहित हे भारतीय संघासाठी वेगवेगळी भूमिका बजावत असल्याने या दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही. सुरुवातीच्या षटकांत पॉवर-प्ले असताना नव्या चेंडूविरुद्ध आक्रमक फलंदाजी करणे हे रोहितचे काम आहे. दुसरीकडे विराटवर जास्तीतजास्त षटके खेळपट्टीवर राहत डावाचा शेवट करण्याची जबाबदारी असते. हे दोघे एकमेकांना चांगली साथ देतात. मात्र, तरीही मला एकाचीच निवड करायची असल्यास मी विराटचे नाव घेईन. धावांचा पाठलाग करत असताना त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. भारतीय संघ दुसर्‍यांदा फलंदाजी करतो, तेव्हा विराट नेहमी आपला खेळ उंचावतो आणि सामने जिंकवून देतो.

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकारानेही कोहली आणि रोहितची स्तुती केली होती. विराट आणि रोहित हे दोघेही खूप खास फलंदाज आहेत. आता एकदिवसीय क्रिकेटच्या नियमांत बदल झाले आहेत आणि त्यामुळे धावा करणे थोडे सोपे झाले आहे. परंतु, भारतीय संघ खूप क्रिकेट खेळत असल्याने खेळाडूंवर ताण येतो. त्यामुळे तुम्ही रोहित आणि विराट यांचा आदर केलाच पाहिजे. प्रत्येकच्या पिढीत क्रिकेटपटूंची एक जोडी असते, जी त्या पिढीचे वर्णन करते. विराट-रोहित ही भारतासाठी सध्याच्या पिढीतील ‘ती’ जोडी आहे, असे संगकारा म्हणाला होता.