घरCORONA UPDATEऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका व्हावी यासाठी टीम इंडिया क्वारंटाईनमध्ये राहण्यास तयार!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका व्हावी यासाठी टीम इंडिया क्वारंटाईनमध्ये राहण्यास तयार!

Subscribe

अरुण धुमाळ यांची माहिती

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषक आणि भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी आणि एकदिवसीय मालिका ठरल्याप्रमाणे व्हावी यासाठी भारतीय संघ दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहण्यास तयार आहे, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. दोन आठवड्याचे लॉकडाऊन हा फार मोठा कालावधी नाही. ही गोष्ट कोणत्याही खेळाडूच्या फायद्याचीच आहे. आता बराच काळ लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर दुसर्‍या देशात जाऊन दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहण्यात खेळाडूंचे हितच आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊननंतर परिस्थिती कशी असेल याचा आढावा घ्यावा लागेल, असे धुमाळ म्हणाले.

- Advertisement -

क्रिकेट ऑस्ट्रेलिया सध्या आर्थिक संकटात आहे. त्यातच भारताविरुद्धची मालिका न झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे ३०० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकेल. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका चारऐवजी पाच सामन्यांची व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, बीसीसीआयने अजून याबाबत निर्णय घेतला नसल्याचे धुमाळ यांनी स्पष्ट केले.

पुन्हा क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतरच आम्ही याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत लॉकडाऊनच्या आधी चर्चा झाली होती. आता एक जास्त कसोटी सामना खेळायचा किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन टी-२० सामने जास्त खेळायचे याबाबतचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांना मिळून घ्यावा लागेल. लॉकडाऊनमुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर अधिक पैसे मिळवण्याचा क्रिकेट बोर्डांचा प्रयत्न असेल आणि कसोटीपेक्षा एकदिवसीय किंवा टी-२० तून जास्त पैसा मिळतो, असे धुमाळ यांनी सांगितले.

- Advertisement -

आयपीएलबाबत अजून निर्णय नाही!
करोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. मात्र, यंदा आयपीएल होणार की नाही, याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही असे अरुण धुमाळ यांनी सांगितले. आम्ही अजून योजना आखलेली नाही. इतक्यात आयपीएल घेण्याचा आमचा विचार नाही. इतर देशांचे खेळाडूही या स्पर्धेत खेळतात. ते भारतात येण्यास आणि दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहण्यास तयार आहेत का हे पाहावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत आम्ही आयपीएलचा विचार तरी कसा करु? आयपीएलची चर्चा मीडियातच जास्त आहे, असे धुमाळ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -