घरक्रीडाऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा वन-डे सामना आज

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा वन-डे सामना आज

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी रांची येथे होणार आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकत ५ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकत भारताला ही मालिका आपल्या खिशात घालण्याची संधी आहे. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीचा आपल्या घरच्या मैदानावरील हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकेल. त्यामुळे या सामन्यात खास कामगिरी करत भारताला सामना जिंकवून देण्याचे त्याचे लक्ष्य असेल.

टी-२० मालिका २-० अशी गमावणार्‍या भारताने एकदिवसीय मालिकेत दमदार पुनरागमन केले. पहिला सामना सहजपणे जिंकल्यानंतर त्यांना दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगलेच झुंजवले. मात्र, कर्णधार विराट कोहलीची अप्रतिम फलंदाजी, युवा विजय शंकरची अष्टपैलू कामगिरी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने हा सामना ८ धावांनी जिंकला. या सामन्यात विजय शंकरने मोक्याच्या क्षणी फलंदाजीत ४६ धावा आणि गोलंदाजीत २ विकेट घेत आपली प्रतिभा दाखवली. विश्वचषकाआधीची ही अखेरची एकदिवसीय मालिका असल्याने त्याचे चांगले प्रदर्शन ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब होती, तसेच जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांनीही या सामन्यात चांगली गोलंदाजी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या मालिकेच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाल्याने, भारतीय संघ अधिकच मजबूत झाला आहे.

- Advertisement -

गोलंदाजांनी आपले दमदार प्रदर्शन सुरु ठेवले असले तरी फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नाही. भारताच्या सलामीवीरांना दोन्ही सामन्यांत चांगली कामगिरी केली नाही. खासकरून शिखर धवनला या मालिकेच्या दोन सामन्यांत मिळून २१ धावाच करता आल्या आहेत, तसेच धवनला मागील १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये अवघी २ अर्धशतकेच करता आली आहेत. दुसरीकडे राखीव सलामीवीर लोकेश राहुलने दोन्ही टी-२० सामन्यांत मिळून ९६ धावा करत आपण फॉर्मात असल्याचे दाखवले होते. त्यामुळे धवनला आपले संघातील स्थान टिकवायचे असल्यास कामगिरीत सुधारणा करावी लागेल.

भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्या २ सामन्यांत चांगले प्रदर्शन केले आहे, मात्र त्यांच्या फलंदाजांना दबावात आपला खेळ उंचावण्यात अपयश आले आहे. त्यामुळे तिसर्‍या सामन्यात सलामीवीर डार्सी शॉर्टला संधी मिळू शकेल. एकूणच जर ऑस्ट्रेलियाला या मालिकेतील आपले आव्हान टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांना हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. जर त्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यात अपयश आले, तर भारत हा सामना जिंकत ही मालिकाही जिंकेल.

- Advertisement -

सामन्याची वेळ – सकाळी १:३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -