AUS vs ENG Ashes Series : अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; अनिश्चित काळासाठी टीम पेनची क्रिकेटमधून माघार

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेनने मानसिक स्वास्थ्य लक्षात घेऊन क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेनने मानसिक स्वास्थ्य लक्षात घेऊन क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षणीय बाब म्हणजे पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतही तो खेळू शकणार नाही. त्याचे मॅनेजर जेम्स हेंडरसन यांनी सांगितले की, “टीम पेनने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी माघार घेतली आहे. यापूर्वी पेनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी घरच्या क्रिकेटचा भाग म्हणून तस्मानियासाठी एक सामना खेळायचा होता मात्र आता विश्रांती घेतल्याचा निर्णय घेतल्यामुळे तो खेळू शकणार नाही.

मॅनेजरने दिली माहिती

टीम पेनने मानसिक स्वास्थ आणि आरोग्याची समस्या लक्षात घेऊन क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. याबाबत पेनचे मॅनेजर जेम्स हेंडरसन यांनी माहिती दिली. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, “टीम पेन मानसिक स्वास्थ आणि आरोग्याच्या कारणामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेत आहे. आम्ही त्याच्या आणि त्याची पत्नी बोनीसाठी खूप चिंतेत आहोत आणि यावेळी अधिक भाष्य करणार नाही. २०१६ मध्ये टीमने बोनीशी लग्न केले आणि त्यांना दोन मुलेही आहेत”.

अश्लील घटना उघडकीस आल्यानंतर दिला होता राजीनामा

२०१७ मध्ये टीम पेनने त्याच्या सहकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवले होते. या अश्लील घटनेनंतर टीम पेनने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग असेल असे बोलले जात होते. अनेक खेळाडूंनीही पेनला अॅशेसमध्ये खेळायला हवे असे म्हंटले होते.

पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदी वर्णी

टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील अॅशेस मालिकेत कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. तर स्टीव्ह स्मिथकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


हे ही वाचा: http://Indonesia Open 2021 : पी.व्ही सिंधूचा उपांत्यफेरीत प्रवेश; दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा केला पराभव