घरक्रीडाTokyo Olympics : जोकोविचला पराभवाचा धक्का; 'गोल्डन स्लॅम'चे स्वप्न भंगले

Tokyo Olympics : जोकोविचला पराभवाचा धक्का; ‘गोल्डन स्लॅम’चे स्वप्न भंगले

Subscribe

यंदाही जोकोविचला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.

सर्बियाचा अव्वल सीडेड टेनिसपटू नोवाक जोकोविचला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा धक्का बसला. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जोकोविचला जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने पराभूत केले. या पराभवामुळे जोकोविचचे ‘गोल्डन स्लॅम’चे स्वप्न भंगले. जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या आतापर्यंतच्या तिन्ही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्याचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचे, तसेच अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकून ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. परंतु, यंदाही त्याला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.

जोकोविचचे आव्हान संपुष्टात

पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जोकोविचवर झ्वेरेवने ६-१, ३-६, १-६ अशी मात केली. जोकोविचने या सामन्याचा पहिला सेट ६-१ अशा मोठ्या फरकाने जिंकला होता. तसेच दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचकडे ३-२ अशी आघाडी होती. यानंतर मात्र जोकोविचचा खेळ खालावला. त्याने सलग चार गेम गमावले आणि हा सेट ३-६ असा गमावला. तिसऱ्या सेटमध्येही त्याला चांगला खेळ करता आला नाही. झ्वेरेवने हा सेट ६-१ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली, तर जोकोविचचे ऑलिम्पिक स्पर्धांतील आव्हान संपुष्टात आले.

- Advertisement -

‘सुवर्ण’ कामगिरी करता आलेली नाही

२० वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचला अजून एकदाही ऑलिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी करता आलेली नाही. यंदाही तो सुवर्णपदक पटकावण्यात अपयशी ठरला. त्याने २००८ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते आणि हीच त्याची ऑलिम्पिक स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा त्याने उपांत्य फेरी गाठली, पण तो पराभूत झाल्याने त्याचे सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरेच राहिले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -