Tokyo Olympics : भालाफेकपटू अन्नू राणीला फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश

अन्नूला पात्रता फेरीत १४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Javelin Thrower Annu Rani
भालाफेकपटू अन्नू राणीचा फायनलमध्ये प्रवेश दोन स्थानांनी हुकला

भारताची भालाफेकपटू अन्नू राणीचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. अन्नूला मंगळवारी झालेल्या पात्रता फेरीतील ‘अ’ गटात १४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. दोन गटांत मिळून अव्वल १२ भालाफेकपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. ५४.०४ मीटर ही अन्नूची पात्रता फेरीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. ६३ मीटरचे अंतर पार करणाऱ्या किंवा अव्वल १२ भालाफेकपटू अंतिम फेरीत प्रवेश करतात. परंतु, अन्नूला दोन्हीत अपयश आले. अन्नूने यावर्षीच्या सुरुवातीला फेडरेशन कप स्पर्धेत ६३.२४ मीटर लांब भालाफेकीची नोंद केली होती. ही तिची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. परंतु, ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत तिला केवळ ५४.०४ मीटर अंतर गाठता आले.

अन्नू १४ व्या स्थानावर 

अन्नूने पात्रता फेरीची सुरुवात ५०.३५ मीटर अंतराने केली. त्यानंतर कामगिरीत सुधारणा करताना तिने दुसऱ्या प्रयत्नात ५३.१९ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात ५४.०४ मीटर लांब भालाफेक केली. त्यामुळे २९ वर्षीय अन्नूला १४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. पोलंडच्या मारिया आंद्रेईझेकने ६५.२५ मीटरची नोंद करत पात्रता फेरीत अव्वल क्रमांक पटकावला. तसेच अंतिम फेरीत थेट प्रवेश करणारी ती एकमेव भालाफेकपटू ठरली. आता भारतीयांचे लक्ष नीरज चोप्राकडे लागले आहे. नीरज सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम भालाफेकपटूंपैकी एक मानला जातो. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्याच्याकडून पदकाची अपेक्षा केली आहे.