Tokyo Olympics : दीपिकाकडून निराशाच!

टोकियो ऑलिम्पिकमध्येही दीपिकाला पदक जिंकता आले नाही.

archer deepika kumari
भारताची तिरंदाज दीपिका कुमारी

भारताची तिरंदाज दीपिका कुमारीकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरीची अपेक्षा केली जात होती. दीपिकाने मागील महिन्यात झालेल्या तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई केली होती. केवळ इतकेच नाही, तर या कामगिरीसह तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेपही घेतली होती. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दीपिका दमदार कामगिरी करेल अशी सर्वच भारतीय क्रीडा चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, दीपिकाने ऑलिम्पिकमध्ये पुन्हा निराशाच केली.

२०१२ लंडन ऑलिम्पिक आणि २०१६ रिओ ऑलिम्पिक पाठोपाठ टोकियो ऑलिम्पिकमध्येही दीपिकाला पदक जिंकता आले नाही. ‘मला मागील कामगिरीची पुनरावृत्ती करायची नाही. मागील दोन ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी न केल्याचे माझ्या डोक्यात आहे. तसेच माझ्यावर थोडे दडपणही आहे. मात्र, या नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा आणि दडपण न घेण्याचा माझा प्रयत्न आहे. मी केवळ मानसिकदृष्ट्या कणखर राहण्यावर, माझ्या खेळावर आणि तंत्रावर लक्ष केंद्रित करत आहे,’ असे दीपिकाने टोकियोला रवाना होण्यापूर्वी म्हटले होते.

दीपिकाने मागील अपयश मागे टाकण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यात तिला फारसे यश आल्याचे म्हणता येणार नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दीपिकावर २०१२ ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली होती. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दीपिकाने एक पाऊल पुढे टाकत उपांत्यपूर्व फेरी गाठली खरी, पण तिला या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.

टोकियोला रवाना होण्यापूर्वी दीपिकाने केलेले विधान हे चिंतेत टाकणारे होते. मागील दोन ऑलिम्पिक स्पर्धांतील निराशाजनक कामगिरी ती विसरू शकली नाही. त्यामुळे तिच्यावर अधिक दडपण आले, जे उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या सान आनविरुद्धच्या लढतीत स्पष्टपणे दिसले. आनने उत्कृष्ट सुरुवात करताना पहिले तिन्ही बाण १०-१० गुणांवर मारले. त्याचवेळी दबावात असलेल्या दीपिकाने सुरुवातीपासूनच हवेचा अंदाज घेण्यात चुक केली. तिने या लढतीतील एकूण नऊ पैकी चार प्रयत्नांत केवळ ७ गुणांवर बाण मारला. ‘वर्ल्ड नंबर वन’ दीपिकाकडून यापेक्षा नक्कीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.

तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या २७ वर्षीय दीपिकापेक्षा पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या २० वर्षीय आन सानने संयमाने खेळ केला. सानने हा सामना ६-० असा जिंकत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीतही तिला दमदार कामगिरी करत विजय मिळवण्यात यश आले. ऑलिम्पिक पदार्पणातच सानने मिश्र दुहेरी, महिला सांघिक आणि महिला एकेरी अशी सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली. दीपिकाची ऑलिम्पिक स्पर्धांतील पदकांची पाटी मात्र कोरीच राहिली. परंतु, दीपिकाकडे अजूनही वेळ आहे. ती पुढील म्हणजेच २०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल. त्यावेळी ती आधीच्या ऑलिम्पिकमधील निराशा मागे टाकेल आणि पदक मिळवेल, हीच आशा!