घरक्रीडाTokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाची अपयशी झुंज; अर्जेंटिनाकडून पराभूत 

Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाची अपयशी झुंज; अर्जेंटिनाकडून पराभूत 

Subscribe

भारताने हा सामना १-२ असा गमावला.

भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. राणी रामपालच्या भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाला झुंज दिली. परंतु, ही झुंज अपयशी ठरली आणि भारताने हा सामना १-२ असा गमावला. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नव्हती. भारतीय संघ पहिल्या तिन्ही सामन्यांत पराभूत झाला होता. त्यानंतर दमदार पुनरागमन करताना भारताने दोन सलग साखळी सामने जिंकल्यावर उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली.

बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाला अधिक काळ चेंडू आपल्याकडे राखण्यात यश आले. परंतु, भारताला गोल करण्याच्या अधिक आणि चांगल्या संधी मिळाल्या. सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर ड्रॅग फ्लिकर गुर्जित कौरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात भारताचा भक्कम बचाव भेदण्यात अर्जेंटिनाला अपयश आले. मात्र, दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाच्या आक्रमणाला धार आली. १८ व्या मिनिटाला कर्णधार मारिया बॅरिओन्यूव्होने गोल करत अर्जेंटिनाला सामन्यात १-१ अशी बरोबरी करून दिली. ही बरोबरी मध्यंतरापर्यंत कायम राहिली.

- Advertisement -

उत्तरार्धातही ३६ व्या मिनिटाला बॅरिओन्यूव्होने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत अर्जेंटिनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. त्यामुळे भारताने हा सामना १-२ असा गमावला. भारताने १९८० मॉस्को ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवले होते आणि हीच भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. परंतु, यंदा हा विक्रम मोडण्याची राणी रामपालच्या संघाला अजूनही संधी आहे.

कांस्यपदकासाठी ग्रेट ब्रिटनचे आव्हान 

भारतीय महिला हॉकी संघाचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले असले तरी या संघाला पदक जिंकण्याची संधी अजूनही कायम आहे. शुक्रवारी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघापुढे ग्रेट ब्रिटनचे आव्हान असेल. हा सामना जिंकल्यास भारतीय संघाला ऑलिम्पिक स्पर्धांतील पहिले पदक जिंकण्यात यश येईल. दुसरीकडे शुक्रवारीच होणाऱ्या अंतिम सामन्यात हॉलंड आणि अर्जेंटिना हे बलाढ्य संघ आमनेसामने येतील.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -