Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : तिरंदाज अतानू दासने ऑलिम्पिक विजेत्याला चारली धूळ; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Tokyo Olympics : तिरंदाज अतानू दासने ऑलिम्पिक विजेत्याला चारली धूळ; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

अतानूने सलग दोन विजयांची नोंद करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Related Story

- Advertisement -

भारताचा आघाडीचा तिरंदाज अतानू दासने टोकियो ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्याला धूळ चारली. त्यामुळे पत्नी दीपिका कुमारीप्रमाणेच अतानूलाही स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. दीपिकाने बुधवारी दमदार कामगिरी करताना महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी अतानूने सलग दोन विजयांची नोंद करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मागील शुक्रवारी झालेल्या क्रमवारी फेरीत अतानूला ३५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे मिश्र दुहेरीत दीपिकासोबत खेळण्यासाठी अतानूऐवजी प्रविण जाधवची निवड करण्यात आली होती. परंतु, पुरुष एकेरीत त्याने उत्कृष्ट खेळ केला.

शूट-ऑफमध्ये अतानूचा अचूक वेध

उप-उपांत्यपूर्व फेरीतील अतानू दास विरुद्ध ओह जिन हेक हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि यंदा सांघिक सुवर्णपदक पटकावणाऱ्या हेकचे या सामन्यात पारडे जड मानले जात होते. मात्र, अतानूने झुंजार खेळ केल्याने चार सेटनंतर दोन्ही खेळाडूंमध्ये ४-४ अशी बरोबरी होती. पाचवा आणि निर्णायक सेटही बरोबरीत संपल्याने दोन्ही खेळाडूंना एक-एक गुण मिळाला. त्यामुळे सामन्यात ५-५ अशी बरोबरी झाली आणि विजेता ठरवण्यासाठी शूट-ऑफ झाले. यात हेकने ९ गुणांवर बाण मारला. त्यामुळे अतानूवर दडपण आले. परंतु, त्याने संयम राखत १० गुणांवर अचूक बाण मारत हा सामना ६-५ अशा फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

- Advertisement -

ताकाहारू फुरूकावाचे आव्हान

त्याआधी अतानूने चिनी तैपेईच्या डेंग यु-चेंगचा ६-४ असा पराभव केला. या सामन्यातही चार सेटनंतर ४-४ अशी बरोबरी होती. मात्र, अतानूने पाचव्या सेटमध्ये बाजी मारत दोन गुण मिळवले आणि हा सामना ६-४ अशा फरकाने जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत अतानूपुढे यजमान जपानच्या ताकाहारू फुरूकावाचे आव्हान असेल. फुरूकावाने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते, तर यंदा सांघिक स्पर्धेत त्याने कांस्यपदकाची कमाई केली होती.

- Advertisement -