घरक्रीडाTokyo Olympics : उष्णता नको रे बाबा!

Tokyo Olympics : उष्णता नको रे बाबा!

Subscribe

केवळ टेनिसपटूच नाही, तर हॉकीपटू, तिरंदाज, सायकलपटू अशा अनेकांना उष्णतेचा खूप त्रास जाणवला आहे.

‘मी सामन्यात खेळत राहू शकतो, पण ते करतानाच माझा मृत्यूही होऊ शकेल. मी मरण पावलो, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?’ असा विचित्र प्रश्न विचारला तो रशियाचा आघाडीचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव्हने. मेदवेदेव्ह आणि इटलीचा फॅबिओ फॉगनिनि यांच्यातील पुरुष एकेरीचा सामना बुधवारी पार पडला. मेदवेदेव्हने हा सामना ६-२, ३-६, ६-२ असा जिंकला खरा, पण या सामन्यादरम्यान ‘आपला जीव धोक्यात येतो की काय?’ असा त्याला प्रश्न पडला होता.

टोकियोमध्ये सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरु आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे प्रत्येकच क्रीडापटूचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी हे खेळाडू खूप मेहनत घेतात, अनेक आव्हानांवर मात करतात. परंतु, ऑलिम्पिकमध्ये खेळताना एखाद्या नैसर्गिक आव्हानाचा सामना करावा लागला तर? सध्या ऑलिम्पिकमध्ये सर्व देशांच्या खेळाडूंचा प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जितके खेळ ‘इन-डोअर’ म्हणजेच बंदिस्त स्टेडियममध्ये होतात, तितकेच खेळ ‘आऊट-डोअर’ म्हणजेच खुल्या मैदानात खेळले जातात.

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिकमध्ये खुल्या मैदानात होणाऱ्या खेळांमध्ये सध्या खेळाडूंना प्रचंड उष्णतेचा, उकाड्याचा, शुष्क आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. २३ जुलैला टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पार पडला. तर स्पर्धांना खऱ्या अर्थाने शनिवार, २४ जुलैला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी खेळाडूंना साधारण ३४ अंश से. कमाल तापमानात खेळणे भाग पडले. तसेच टोकियो आणि आसपासच्या भागात ८० टक्के आद्रतेची नोंद केली गेली. या वातावरणात खेळणे, विशेषतः युरोपियन देशांच्या खेळाडूंना फारच अवघड गेले.

यंदाचे ऑलिम्पिक हे सर्वात उष्ण वातावरणात झालेल्या ऑलिम्पिकपैकी एक असणार असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. उन्हाळ्यामध्ये टोकियो हे जगातील सर्वात उष्ण शहरांपैकी एक असते. विशेषतः पावसाळ्यानंतरच्या महिन्यात उष्णता अधिकच वाढते. यंदा याच काळात टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा खेळवली जात आहे. उष्णतेपासून खेळाडूंचा बचाव व्हावा यासाठी आयोजकांनी बराच खर्च केला होता. परंतु, सर्बियाचा सुपरस्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि मेदवेदेव्ह यांच्या वक्तव्यांवर नजर टाकल्यास, आयोजकांनी केलेल्या खर्चाचा फारसा उपयोग झाला नाही असे म्हणता येऊ शकेल.

- Advertisement -

‘मी इतर खेळाडूंशी चर्चा केली. ते माझ्याशी सहमत होते. आजच्या दिवशी सर्वात उष्ण वातावरण होते. केवळ उष्ण नाही, तर हवामान दमटही होते. त्यामुळे टेनिस कोर्ट फार गरम झाले होते,’ असे पहिल्या फेरीतील विजयानंतर जोकोविच म्हणाला होता. तसेच या परिस्थितीत बदल होईल अशी आशाही त्याने व्यक्त केली होती. मात्र, अजून तसे झालेले नाही. बुधवारीही उष्णता कायम राहिली आणि याचा त्रास मेदवेदेव्ह, तसेच स्पेनची खेळाडू पॉला बडोसाला झाला. मेदवेदेव्ह पुढेही खेळत राहिला, पण पॉलाला उष्माघातामुळे स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले.

खेळाडूंची ही अवस्था पाहून आता आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन आणि आयोजकांनी यापुढील सामन्यांच्या वेळा काही तासांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता टेनिसचे सामने जपानमधील वेळेनुसार, सकाळी ११ ऐवजी दुपारी ३ वाजल्यापासून खेळले जाणार आहेत. केवळ टेनिसपटूच नाही, तर हॉकीपटू, तिरंदाज, सायकलपटू अशा अनेकांना उष्णतेचा खूप त्रास जाणवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ‘उष्णता नको रे बाबा,’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -