Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : भारताला मोठा धक्का; बॉक्सर अमित पांघल उप-उपांत्यपूर्व फेरीत गारद

Tokyo Olympics : भारताला मोठा धक्का; बॉक्सर अमित पांघल उप-उपांत्यपूर्व फेरीत गारद

ऑलिम्पिक पदार्पणात पांघलला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. 

Related Story

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी भारताला मोठा धक्का बसला. भारताचा आघाडीचा बॉक्सर अमित पांघलला उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या कोलंबियाच्या युबेर्जेन मार्टिनेझने ५२ किलो वजनी गटात पांघलवर १-४ अशी मात केली. या पराभवामुळे पांघलचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या पांघलकडून यंदा सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. त्याला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. मात्र, याचा त्याला फारसा फायदा झाला नाही. दुसऱ्या फेरीत मार्टिनेझच्या आक्रमक खेळापुढे पांघलचा निभाव लागला नाही.

पांघलचा खेळ खालावला  

उप-उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मार्टिनेझने सुरुवातीपासूनच पांघलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पांघलने चांगला बचाव करतानाच प्रतिहल्लाही केला. त्यामुळे पहिल्या फेरीत पाच पैकी चार पंचांनी निकाल पांघलच्या बाजूने दिला. दुसऱ्या फेरीत मार्टिनेझने आक्रमक खेळ सुरु ठेवला. मात्र, यावेळी पांघलला चांगला बचाव करता आला नाही. मार्टिनेझने विशेषतः अप्परकटचा उत्तम वापर करत पांघलवर हल्ला चढवला. तिसऱ्या फेरीतही पांघलच्या खेळात सुधारणा झाली नाही. याचा फायदा घेत मार्टिनेझने अखेरच्या दोन्ही फेऱ्या जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisement -

पांघलला थकवा जाणवू लागला

मार्टिनेझने आक्रमक शैलीत खेळ केल्याने पांघलला बचाव करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागले. त्यामुळे त्याला थकवा जाणवण्याचे सामन्यानंतर भारताचे प्रशिक्षक सॅंटियागो निएवा म्हणाले. ‘अमितला थकवा जाणवू लागला होता. प्रतिहल्ला करण्यासाठी त्याच्यात ताकद शिल्लक नव्हती. तिथेच कोलंबियाच्या खेळाडूने गुण मिळवले. मी याआधी कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध अमितला इतका थकलेला पाहिलेले नाही,’ असे निएवा यांनी सांगितले. २५ वर्षीय पांघलने याआधी २०१८ एशियाडमध्ये सुवर्णपदक आणि २०१९ जागतिक स्पर्धांमध्ये रौप्यपदक जिंकले होते. परंतु, ऑलिम्पिक पदार्पणात त्याला सर्वोत्तम खेळ करता आला नाही.

- Advertisement -