घरक्रीडाOlympic Games : टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांविना? अध्यक्षांनी दिले संकेत

Olympic Games : टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांविना? अध्यक्षांनी दिले संकेत

Subscribe

ऑलिम्पिक यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.

कोरोनामुळे मागील वर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले होते. यंदा ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि आयोजकांचा ही स्पर्धा प्रेक्षकांसह घेण्याचा मानस होता. परंतु, जपानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने आता टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांविना घेणे भाग पडू शकेल, असे संकेत टोकियो २०२० च्या अध्यक्षा सेइको हाशिमोटो यांनी दिले आहेत. सहभागी झालेले खेळाडू आणि जपानचे लोक पूर्णपणे सुरक्षित राहिले तरच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली असे म्हणता येईल, असेही हाशिमोटो यांनी स्पष्ट केले.

परदेशी प्रेक्षकांवर याआधीच बंदी

जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने परदेशी प्रेक्षकांवर याआधीच बंदी घालण्यात आली होती. जपानच्या नागरिकांना ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश देण्याबाबतचा निर्णय या आठवड्यात घेण्यात येणार होता. परंतु, आता जपानमध्ये कोरोनाची नवी लाट आल्याने आयोजकांनी हा निर्णय जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. पुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आम्हाला प्रेक्षकांविनाच ऑलिम्पिकचे आयोजन करावे लागू शकेल, असे हाशिमोटो एका मुलाखतीत म्हणाल्या.

- Advertisement -

जपानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

काही दिवसांपूर्वीच टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत जपानी लोकांचा सर्वे घेण्यात आला होता. बहुतांश लोकांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्याला किंवा रद्द करण्याला पसंती दर्शवली होती. त्यातच आता टोकियोसह जपानमधील इतर भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असल्याने ऑलिम्पिकबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जपानमधील आरोग्य यंत्रणेवर ताण असून ऑलिम्पिकसाठी अतिरिक्त मेडिकल अधिकाऱ्यांची मागणी केल्याने आयोजकांवर टीकाही झाली होती. मात्र, प्रेक्षक नसल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण आपोआपच कमी होईल, असे हाशिमोटो यांना वाटते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -