घरक्रीडाTokyo Olympics : भारताच्या रायफल नेमबाजांची अडचण; सरावासाठी केवळ २० मिनिटे

Tokyo Olympics : भारताच्या रायफल नेमबाजांची अडचण; सरावासाठी केवळ २० मिनिटे

Subscribe

रायफल नेमबाजांना पुरेशा सरावाविनाच मुख्य स्पर्धेत खेळावे लागू शकेल. 

टोकियो ऑलिम्पिकला आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. २३ जुलैला ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून दुसऱ्या दिवसापासून स्पर्धांना सुरुवात होईल. परंतु, त्याआधी भारताच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात खेळणाऱ्या नेमबाजांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असाका शूटिंग रेंजवर पुरेशी जागा नसल्याने भारताच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील नेमबाजांना सरावासाठी केवळ २० मिनिटांचा वेळ मिळत आहे. भारताच्या नेमबाजांकडून यंदा दमदार कामगिरीची आणि पदकांची अपेक्षा केली जात आहे. परंतु, रायफल नेमबाजांना पुरेशा सरावाविनाच मुख्य स्पर्धेत खेळावे लागू शकेल.

सर्वच देशांच्या नेमबाजांचा एका ठिकाणी सराव

भारताच्या अन्य नेमबाजांना सरावासाठी दोन तासांहून अधिकच वेळ दिला जात आहे. परंतु, अपूर्वी चंडेला आणि एलावेनिल वालारिवान यांसारख्या भारताच्या रायफल नेमबाज केवळ २० मिनिटे सराव करू शकल्या आहेत. २४ जुलैपासून स्पर्धांना सुरुवात होणार असून अगदी पहिल्या दिवसापासूनच भारताचे रायफल नेमबाज विविध स्पर्धांत सहभागी होणार आहेत. ‘सर्वच देशांचे नेमबाज एका ठिकाणी सराव करत असल्याने वेळेची समस्या उद्भवत आहे,’ असे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनकडून (एनआरएआय) सांगण्यात आले.

- Advertisement -

महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धा शनिवारी

‘बुधवारी नेमबाजांना सकाळच्या सत्रात दोन-अडीच तास सराव करण्याची संधी मिळाली. परंतु, भारताच्या १० मीटर एअर रायफल संघाला सरावासाठी केवळ २० ते ३० मिनिटेच मिळू शकली,’ असेही एनआरएआयने सांगितले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धांना शनिवारी, तर पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धांना रविवारी सुरुवात होणार आहे.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -