Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा अर्जेंटिनाला धक्का; ऑलिम्पिकमध्ये आगेकूच

Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा अर्जेंटिनाला धक्का; ऑलिम्पिकमध्ये आगेकूच

चार सामन्यांत केवळ एक पराभव आणि तीन विजयांसह भारताने 'अ' गटात दुसरे स्थान निश्चित केले आहे.

Related Story

- Advertisement -

भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी अनपेक्षित विजयाची नोंद करत टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताने गतविजेत्या अर्जेंटिनाला ३-१ असा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेत आगेकूच करणार हे निश्चित झाले आहे. भारताला यंदा ‘अ’ गटात चार पैकी तीन साखळी सामने जिंकण्यात यश आले. यंदाच्या ऑलिम्पिकची विजयी सुरुवात करताना भारताने न्यूझीलंडवर मात केली होती. त्यानंतर भारताला दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-७ असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. मात्र, भारताने दमदार पुनरागमन करताना पुढील दोन सामन्यांत स्पेन आणि अर्जेंटिना या संघांना पराभूत करण्याची कामगिरी केली.

अखेरच्या दोन मिनिटांत दोन गोल

अर्जेंटिनाविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पूर्वार्धात भारताने सामन्यात वर्चस्व गाजवले, पण त्यांना अर्जेंटिनाचा भक्कम बचाव भेदता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला दोन्ही संघांत गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र सामन्यात रंगत आली. ४३ व्या मिनिटाला वरूण कुमारने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी केवळ पाच मिनिटेच टिकू शकली. ४८ व्या मिनिटाला शुथ कासेल्लाने केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. यानंतर मात्र भारताने अधिकच आक्रमक खेळ केला. सामन्याच्या अखेरच्या दोन मिनिटांत विवेक सागर प्रसाद आणि हरमनप्रीत सिंग यांनी दोन गोल करत भारताला ३-१ असा विजय मिळवून दिला.

- Advertisement -

दुसरे स्थान निश्चित

चार सामन्यांत केवळ एक पराभव आणि तीन विजयांसह भारताने ‘अ’ गटात दुसरे स्थान निश्चित केले आहे. या गटात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. आता भारताचा शुक्रवारी होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात यजमान जपानचे आव्हान असेल. दोन्ही गटांतील अव्वल चार संघ हे उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये आगेकूच करण्यासाठी अर्जेंटिनाला शुक्रवारी होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करावे लागणार आहे.

- Advertisement -