Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : तब्बल ४९ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत...

Tokyo Olympics : तब्बल ४९ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

भारतीय पुरुष हॉकी संघाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Related Story

- Advertisement -

भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केली. भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनला ३-१ असे पराभूत करत तब्बल ४९ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धांची उपांत्य फेरी गाठली. आठ वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताने पाच पैकी चार साखळी सामने जिंकत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती आणि या फेरीत त्यांना ग्रेट ब्रिटनविरुद्ध मोठा विजय मिळवण्यात यश आले.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताकडून दिलप्रीत सिंग (७ वे मिनिट), गुर्जंत सिंग (१६ वे मिनिट) आणि हार्दिक सिंग (५७ वे मिनिट) यांनी गोल केले. ब्रिटनचा एकमेव गोल सॅम वॉर्डने ४५ व्या मिनिटाला केला. भारताने १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र, त्यावेळी केवळ सहा संघच या स्पर्धांमध्ये खेळल्याने उपांत्य फेरी झाली नव्हती. भारताचा ऑलिम्पिक स्पर्धांतील अखेरचा उपांत्य फेरीतील सामना १९७२ सालच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये झाला होता आणि त्यावेळी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारतावर २-० अशी मात केली होती.

उपांत्य फेरीत बेल्जियमचे आव्हान

- Advertisement -

उपांत्य फेरीत भारतीय पुरुष हॉकी संघापुढे विश्वविजेत्या बेल्जियमचे आव्हान असेल. हा सामना मंगळवारी पार पडणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा ३-१ असा पराभव केला. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत.

- Advertisement -