घरक्रीडाTokyo Olympics : बोचरे अपयश!

Tokyo Olympics : बोचरे अपयश!

Subscribe

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताची पदकांची पाटी कोरीच राहिली.

‘जे चुकू शकते, ते चुकले,’ असेच टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीबाबत म्हणता येईल. भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकली होती, जी भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकांचा दुहेरी आकडा गाठण्यात यश येईल अशी आशा व्यक्त केली जात होती. भारताला यंदा सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती, ती नेमबाजांकडून. मात्र, भारतीय नेमबाज सपशेल अपयशी ठरले. भारतीय नेमबाजांना यंदा भोपळाही फोडता आला नाही.

भारताला २००४ (राज्यवर्धन सिंह राठोड), २००८ (अभिनव बिंद्रा) आणि २०१२ (गगन नारंग) अशा सलग तीन ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांनी एक-एक पदक मिळवून दिले होते. मात्र, २०१६ रिओ ऑलिम्पिक पाठोपाठ यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताची पदकांची पाटी कोरीच राहिली. मागील दोन-तीन वर्षांतील नेमबाजांच्या दमदार कामगिरीमुळे यंदा त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जात होती. परंतु, या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

- Advertisement -

यंदा नेमबाजीत मिश्र दुहेरी हा प्रकार पहिल्यांदाच खेळला गेला आणि यात भारताला एक-दोन पदके मिळतील अशी अपेक्षा केली जात होती. विशेषतः मनू भाकर आणि सौरभ चौधरी या युवा पिस्तूल नेमबाजांना पदकांचे प्रमुख दावेदार मानले जात होते. या दोघांनी १० मीटर पिस्तूलच्या पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात अव्वल क्रमांक पटकावला खरा, पण दुसऱ्या टप्प्यात त्यांचा खेळ खालावला. त्यांना सातवा क्रमांकच मिळवता आल्याने भारताची ही हुकमी जोडी अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नाही.

मनूने आणि सौरभ या १९ वर्षीय नेमबाजांनी मिळून दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. तसेच मागील काही वर्षांत मनूला वर्ल्डकप, युवा वर्ल्डकप, राष्ट्रकुल स्पर्धा, तर सौरभला युवा ऑलिम्पिक, वर्ल्डकप, एशियाड, आशियाई स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकण्यात यश आले होते. परंतु, टोकियो ऑलिम्पिकमध्ये या दोघांना पदकाच्या जवळपासही जाता आले नाही. सौरभने १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक गटातील पात्रता फेरीत अव्वल क्रमांक पटकावत अंतिम फेरी गाठली आणि हीच यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही भारतीय नेमबाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी!

- Advertisement -

भारताच्या तब्बल १५ नेमबाजांना यंदा ऑलिम्पिक कोटा मिळाला होता. परंतु, सौरभ वगळता भारताच्या एकाही नेमबाजाला पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही. त्यातच स्पर्धेदरम्यान नेमबाजांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्याही बाहेर आल्या. मनू भाकरने जसपाल राणासारख्या उत्कृष्ट नेमबाजी प्रशिक्षकांशी वाद झाल्याने त्यांच्याऐवजी अचानक दुसऱ्या प्रशिक्षकांची निवड केली. याचा नक्कीच तिच्या कामगिरीवर परिणाम झाला. टोकियो ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीमुळे आता नेमबाजांबाबत बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची लवकरच उत्तरे शोधणे खूप गरजेचे आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -