Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर मात; उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम

भारताचा हा चार सामन्यांत पहिलाच विजय ठरला.

india women's hockey team
भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर मात

सामना संपायला काहीच मिनिटे शिल्लक असताना नवनीत कौरने केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आयर्लंडवर १-० अशी मात केली. या विजयामुळे भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशाच्या आशा कायम राखल्या आहेत. भारतीय महिला हॉकी संघाला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारताने सलग तीन सामने गमावले होते. परंतु, आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चांगला खेळ करत विजय मिळवला. आता भारताचा अखेरचा साखळी सामना शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये आगेकूच करण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार असून ग्रेट ब्रिटनने अखेरच्या सामन्यात आयर्लंडला पराभूत करणे गरजेचे आहे.

दोन सत्रांमध्ये १० पेनल्टी कॉर्नर

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे त्यांना गोलच्या काही संधी मिळाल्या. मात्र, पहिल्या तीन सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही भारताला संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. पहिल्या दोन सत्रांमध्ये भारतीय महिला संघाला तब्बल १० पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला सामन्यात गोलशून्य बरोबरी होती.

नवनीत कौरचा गोल 

उत्तरार्धात लगेचच भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु, त्यांनी गोल करण्याची संधी पुन्हा वाया घालवली. भारतीय संघाने पुढेही आक्रमक खेळ सुरु ठेवला. सामना संपायला काहीच मिनिटे बाकी असताना नवनीत कौरने या सामन्यातील एकमेव गोल करत भारताला सामना १-० असा जिंकवून दिला. या विजयामुळे भारताने या ऑलिम्पिकमधील आपले आव्हान कायम राखले आहे.