Tokyo Olympics : भारताला धक्का; कुस्तीपटू सुमित मलिक डोपिंग चाचणीत दोषी

ऑलिम्पिकपूर्वी भारतीय कुस्तीपटू डोपिंग चाचणीत दोषी आढळण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.

indian wrestler sumit malik fails dope test
कुस्तीपटू सुमित मलिक

टोकियो ऑलिम्पिकला काहीच महिने शिल्लक असताना भारताला धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय कुस्तीपटू सुमित मलिक उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोपिंग) दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ऑलिम्पिकपूर्वी भारतीय कुस्तीपटू डोपिंग चाचणीत दोषी आढळण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. २०१६ रिओ ऑलिम्पिकपूर्वी नरसिंह यादव डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न राहणार अधुरे?

नुकत्याच बल्गेरिया येथे झालेल्या पात्रता स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे सुमित मलिक टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. परंतु, १२५ किलो वजनी गटात खेळणाऱ्या सुमितचे ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचे स्वप्न आता अधुरेच राहण्याची दाट शक्यता आहे. २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सुमित टोकियो ऑलिम्पिकला मुकणे हा भारतासाठी मोठा धक्का असेल.

बल्गेरियातील पात्रता स्पर्धेत चांगला खेळ 

विविध देशांतील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा सुरु होण्याआधी सुमितच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, तो एप्रिलमध्ये आशियाई पात्रता स्पर्धेत खेळला, पण त्याला ऑलिम्पिक कोटा मिळवण्यात अपयश आले. त्यानंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही तो पदक जिंकू शकला नाही. परंतु, मागील महिन्यात बल्गेरिया येथे झालेल्या पात्रता स्पर्धेत अंतिम फेरी गाठत सुमितने टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे अंतिम फेरीत त्याला खेळता आले नाही.