घरक्रीडाTokyo Olympics : कमलप्रीत कौरची कमाल; थाळीफेकच्या अंतिम फेरीत मारली धडक

Tokyo Olympics : कमलप्रीत कौरची कमाल; थाळीफेकच्या अंतिम फेरीत मारली धडक

Subscribe

अंतिम फेरी २ ऑगस्टला रंगणार आहे.

भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. शनिवारी झालेल्या पात्रता फेरीत कमलप्रीतने दुसरा क्रमांक पटकावत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये थाळीफेक क्रीडा प्रकारात पात्रता फेरीचा अडथळा पार करणारी ती पहिलीवहिली भारतीय खेळाडू ठरली. २५ वर्षीय कमलप्रीतने पात्रतेच्या ‘ब’ गटात आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ६४ मीटर लांब थाळीफेक केली. पात्रता फेरीत दोन थाळीफेकपटूंना थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आणि यात कमलप्रीतचा समावेश होता. तिच्यासह अमेरिकेच्या वॅलरी ऑलमनलाही (६६.४२ मीटर) थेट अंतिम फेरी गाठण्यात यश आले. अंतिम फेरी २ ऑगस्टला रंगणार आहे.

प्रत्येक प्रयत्नात कामगिरीत सुधारण

कमलप्रीतने पहिल्या प्रयत्नात ६०.२९ मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ६३.९७ मीटर अंतराची नोंद केली होती. परंतु, तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात तिने कामगिरीत सुधारणा केली. तिने ६४ मीटर लांब थाळीफेक करत पात्रतेच्या ‘ब’ गटात दुसरा क्रमांक मिळवला. ६४ मीटर अंतराची नोंद करणाऱ्यांसह दोन गटांतील सर्वोत्तम १२ थाळीफेकपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. भारताच्याच सीमा पुनियाला मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. तिने केवळ ६०.५७ मीटर अंतराची नोंद केली. त्यामुळे ती पात्रतेच्या ‘अ’ गटात सहाव्या, तर एकूण १६ व्या स्थानी राहिली.

- Advertisement -

यावर्षी सातत्यपूर्ण कामगिरी 

कमलप्रीतने यावर्षी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तिने नुकतेच दोनदा ६५ मीटरचे अंतर पार केले होते. मार्चमध्ये झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत तिने ६५.०६ मीटर लांब थाळीफेक करत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. ६५ मीटरहून अधिक लांब थाळीफेक करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली होती. त्यानंतर जूनमध्ये तिने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत ६६.५९ मीटर अंतराची नोंद केली होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -