Tokyo Olympics : मेरी कोम, मनप्रीत सिंग या ध्वजवाहकांच्या नेतृत्वात भारतीय पथकाचे संचलन

स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी प्रत्येक देशाकडून एक पुरुष आणि एक महिला असे दोन ध्वजवाहक नेमण्यात आले होते.

tokyo olympics Manpreet Singh and Mary Kom led India's contingent out during opening ceremony
मेरी कोम आणि मनप्रीत सिंग या ध्वजवाहकांच्या नेतृत्वात भारतीय पथकाचे संचलन

टोकियो ऑलिम्पिकचे बिगुल अखेर वाजलेच. कोरोनामुळे एका वर्षाने लांबणीवर पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात झाली. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा न्यू नॅशनल स्टेडियमवर पार पडत असून प्रत्येक देशाचे मर्यादित क्रीडापटू संचलनात सहभागी झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक देशाच्या केवळ मर्यादित खेळाडूंनाच ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी प्रत्येक देशाकडून एक पुरुष आणि एक महिला असे दोन ध्वजवाहक नेमण्यात आले होते. सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग या ध्वजवाहकांच्या नेतृत्वात भारतीय पथकाने संचलन केले.

या उद्घाटन सोहळ्यात जपानी इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रमही झाला. संचलन, ऑलिम्पिक गीताचे सादरीकरण आणि ऑलिम्पिक शपथ खेळाडूंनी घेतली. उद्घाटन सोहळ्यात सहभागी झालेल्या भारतीय पथकात एकूण २५ जणांचा समावेश होता. संचलन करून झाल्यावर भारताचे काही खेळाडू हा विस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये टिपताना दिसले.