Tokyo Olympics : ऑलिम्पिक पदकविजेत्या मीराबाई चानूने जल्लोषात स्वागत; क्रीडा मंत्र्यांनी केला सत्कार

मीराबाईची कामगिरी भारतातील नवीन पिढीला प्रेरणा देत राहील, असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

mirabai chanu felicitated by union sports minister anurag thakur
ऑलिम्पिक पदकविजेत्या मीराबाई चानूचा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला सत्कार; यावेळी किरण रिजिजूसुद्धा उपस्थित होते

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकांचे उघडणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूचे मायदेशी जल्लोषात स्वागत झाले. मीराबाई सोमवारी मायदेशी परतली. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मीराबाई दाखल होताच ‘भारत माता की जय’चे नारे देण्यात आले. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) अधिकाऱ्यांसह अन्य काही लोकांनी तिचा सत्कार केला. त्यानंतर मंगळवारी मीराबाईने प्रशिक्षक विजय शर्मा यांच्यासह केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी ठाकूर यांनी मीराबाईचा सत्कार केला. यावेळी माजी क्रीडा मंत्री किरण रिजिजू, किशन रेड्डी, एसएच सर्बानंद सोनोवाल आणि निसिथ प्रामाणिक आदी केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

कामगिरी नवीन पिढीसाठी प्रेरणादायी 

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवस वेटलिफ्टर मीराबाईने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलोचे वजन उचलत रौप्यपदक जिंकले होते. भारताचे हे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांतील आतापर्यंतचे एकमेव पदक आहे. ‘मीराबाई चानूचा विजय हा १३० भारतीयांचा विजय होता. पदक समारंभात जेव्हा भारताचा झेंडा उंचावला गेला आणि राष्ट्रगीत लावले गेले, तेव्हा संपूर्ण भारताला अभिमान वाटत होता. भारताने ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मीराबाईच्या यशाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतातील नवीन पिढीला तिची कामगिरी प्रेरणा देत राहील,’ असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

स्वप्न पूर्ण झाले – मीराबाई 

‘ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. याच क्षणासाठी मी कित्येक वर्षे प्रशिक्षण घेत होते आणि ऑलिम्पिक या खेळांमधील सर्वात मोठ्या स्तरावर मला यश मिळाल्याचा अतिशय आनंद आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीने मी त्रस्त होते आणि यावर उपचार घेण्यासाठी मला दोनदा अमेरिकेत जावे लागले. सरकारने यावेळी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेमुळे (TOPS) मला खूप मदत झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया मीराबाई चानूने दिली.