घरक्रीडाNeeraj Chopra : तू इतिहास लिहिलास...

Neeraj Chopra : तू इतिहास लिहिलास…

Subscribe

भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा यानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर नीरजनं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

मिल्खा सिंग यांना जे जमले नाही, पी.टी. उषाला जे मिळवता आले नाही, ते शेवटी भालाफेकपटू नीरज चोप्राने करून दाखवले… शाब्बास मित्रा, भावा… तुला काय म्हणू. आज शब्द अपूरे आहेत. या पराक्रमाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. भारताची ऑलिम्पिक हॉकीमधील ८ सुवर्णपदके, कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाने मिळवलेले वर्ल्ड कप इतकीच तुझी कामगिरी मोठी आहे. मी तर म्हणेन यापेक्षाही काकणभर सरस. कारण ऑलिम्पिकच्या इतिहासात अ‍ॅथलेटिक्समध्ये तू भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. मिल्खा आणि उषा या दोघांचे ब्राँझ पदक एक शतांश सेकंदाने हुकले होते. भारताचे हे अपयश बोचरे होते.

१३० कोटींच्या भारतात असा कोणी खेळाडू निर्माण होणार आहे की नाही जो हे यश मिळवेल, या प्रश्नाने मन भिरभिरत असताना टोकियो ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी तू अ‍ॅथलेटिक्स पदकाचा दुष्काळ संपवला… तुझ्या कामगिरीचे वर्णन करायचे झाल्यास तू आलास, तू पाहिलंस आणि तू जिंकलंस… असंच करावं लागेल. शनिवारी सगळ्या भारतीयांच्या नजरा तुझ्या कामगिरीवर होत्या. कारण तू आधी प्राथमिक फेरीत सर्व स्पर्धकांमध्ये पहिला होतास. तू नक्की पदक मिळवणार असे वाटत असताना पहिल्या दोन फेकीतच तू सुवर्ण जिंकलंस…

- Advertisement -

दुसर्‍याच प्रयत्नात तू  ८७ मीटरवर फेकलेल्या भाल्याने तू सुवर्ण पदकावर भारताचं नाव कोरलंस. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. खेळांवर प्रेम करणार्‍या प्रत्येक क्रीडाप्रेमींची ती भावना होती. कारण ऑलिम्पिक पदक आणि ते सुद्धा सुवर्ण मिळवणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. खूप त्याग करावा लागतो. सतत एकच ध्यास घ्यावा लागतो. घर नाही, दार नाही, मित्र नाही, पार्टी नाही. शरीर आणि मन एकत्र बांधून ठेवावे लागते. मुख्य म्हणजे जेव्हा जगातले अव्वल खेळाडू समोर उभे टाकतात तेव्हा त्या सगळ्यांना मागे टाकून तुम्ही सर्वोत्तम आहात हे जगाला दाखवून द्यावं लागतं…

२०१९ ला तुला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तुला अनेक स्पर्धांपासून मुकावं लागलं होतं. मात्र ओलीम्पिकमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे असा निर्धार करून तू टोकियोला उतरला होतास. वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), व्हेटर (जर्मनी), नदीम (पाकिस्तान),, वेसली (चेक रिपब्लिक), इटेलाटालो (फिनलँड) या तगड्या स्पर्धकांचे मोठे आव्हान होत. खास करून जर्मनीचा व्हेटर तर ९० मीटरपेक्षा लांब भाला फेकत होता. त्याने या एका वर्षात ९० मीटरपेक्षा अधिक अंतरावर सातवेळा भाला फेकला होता. नीरज त्याच्या सोबत जर्मनीमध्येच गेले काही महिने सर्व करत होता.

- Advertisement -

आपली अफाट कामगिरी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर व्हेटर हे बोलत होता… पण नीरज शांत. ती वादळापूर्वीची शांतता होती. अंतिम फेरीत तू उतरलास ते एका अफाट विश्वासाच्या जोरावर. तो पहिल्याच प्रयत्नात दिसला आणि तू ८५ मीटरवर भाला फेकलास आणि वाटून गेले की तू नक्की सुवर्ण जिंकणार. तसेच झाले. दुसरा भाला तुझा ८७ मीटर पार करून गेला आणि भारतीयांचे डोळे भरून आले… ते सुवर्ण अश्रू होते!

भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा यानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर नीरजनं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. २०१६ मध्ये पोलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील आयएएएफ जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यानं  सुवर्णपदक मिळवलं होतं. यानंतर नीरजची इंडियन आर्मीत ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. सुरुवातीच्या काळात नीरज इतरांप्रमाणं क्रिकेट खेळत होता. नीरजने मार्च २०२१ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाळा येथे ८८.०७ मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता.

यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितले नाही. २०१८ मध्ये नीरजनं एशियाडला सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी त्यानं ८८.०६ मीटर भाला फेकला होता. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. एशियाड आणि राष्ट्रकुलमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर २०१८मध्ये नीरजच्या खांद्याला दुखापत झाली होती. या कारणाने तो अनेक दिवस खेळापासून दूर होता. खेळाडूंना आयुष्यात दुखापती सोबत घेऊन जगावे लागते. मुख्य म्हणजे क्रिकेट सोडले तर भारतात इतर खेळांमधील खेळाडूंना खूप अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तसा तो नीरजला सुद्धा करावा लागला. पण, याचा कसलाच बाऊ न करता तो शेवटी त्याने बाजी मारली. शाब्बास नीरज. तुझा आम्हाला आभिमान वाटतो…!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -