घरक्रीडाTokyo Olympics : नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न; दीपिका कुमारी दमदार कामगिरीसाठी...

Tokyo Olympics : नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न; दीपिका कुमारी दमदार कामगिरीसाठी सज्ज

Subscribe

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी दीपिकाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीला मागील दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, असे असूनही ती नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दीपिकावर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली होती. तर २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत, तर महिलांच्या सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा मात्र दमदार कामगिरीसाठी ती उत्सुक आहे.

खेळावर आणि तंत्रावर लक्ष केंद्रित

मला मागील कामगिरीची पुनरावृत्ती करायची नाही. मागील दोन ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी न केल्याचे माझ्या डोक्यात आहे. तसेच माझ्यावर थोडे दडपणही आहे. मात्र, या नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा आणि दडपण न घेण्याचा माझा प्रयत्न आहे. मी केवळ मानसिकदृष्ट्या कणखर राहण्यावर, माझ्या खेळावर आणि तंत्रावर लक्ष केंद्रित करत आहे, असे दीपिका म्हणाली. दीपिकाचा पती आणि तिरंदाज अतानु दासही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. दीपिका आणि अतानु ही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी भारताची पहिलीच पती-पत्नीची जोडी असेल.

जागतिक क्रमवारीत अव्वल 

दीपिकाने मागील महिन्यात झालेल्या तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई केली होती. या कामगिरीच्या जोरावर तिने तिरंदाजी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली होती. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी दीपिकाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. दीपिका २०१२ लंडन ऑलिम्पिकच्या वेळीही जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी होती. त्या स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नसली तरी यंदा तिचे पदक मिळवण्याचे लक्ष्य आहे.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -