Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : सिंधूची विजयांची हॅटट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत यामागूचीचे आव्हान

Tokyo Olympics : सिंधूची विजयांची हॅटट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत यामागूचीचे आव्हान

सिंधू यंदा पदकापासून केवळ दोन विजय दूर आहे.

Related Story

- Advertisement -

भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. सिंधूने सलग दोन साखळी सामने जिंकत बाद फेरीत प्रवेश केला होता. या फेरीत तिने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. २०१६ रिओ ऑलिम्पिक स्पर्धांतील रौप्यपदक विजेती सिंधू यंदा पदकापासून केवळ दोन विजय दूर आहे. हे दोन विजय मिळवण्यात यश आल्यास ती नवा विक्रम प्रस्थापित करेल. याआधी भारताच्या कोणत्याही महिला खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवता आलेली नाहीत. उपांत्यपूर्व फेरीत तिचा यजमान जपानच्या अकाने यामागूचीविरुद्ध सामना होईल.

सिंधूचा सरळ गेममध्ये विजय 

गुरुवारी झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूने ब्लिचफेल्डचा २१-१५, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या सामन्यात सिंधूने सुरुवातीला सावध खेळ केला. परंतु, काही फटक्यांनंतर तिने आक्रमकता दाखवत ८-४ अशी आघाडी मिळवली. मध्यंतराला सिंधूकडे ११-६ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर मात्र ब्लिचफेल्ड अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सिंधूने काही चुका केल्या आणि तिची आघाडी १६-१५ अशी कमी झाली. यानंतर मात्र सिंधूने सलग पाच गुण मिळवत पहिला गेम २१-१५ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आक्रमक सुरुवात करत ५-० अशी आघाडी घेतली. ब्लिचफेल्डने तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात तिला फारसे यश आले नाही. सिंधूने दुसरा गेम २१-१३ अशा मोठ्या फरकाने जिंकत सामनाही जिंकला आणि स्पर्धेत आगेकूच केली.

उपांत्यपूर्व फेरीत यामागूचीचे आव्हान

- Advertisement -

उपांत्यपूर्व फेरीत सिंधूपुढे यजमान जपानच्या अकाने यामागूचीचे आव्हान असेल. सिंधू आणि यामागूची यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाले असून सिंधूने ११ सामन्यांत बाजी मारली आहे. या दोघींमधील अखेरचा सामना ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत झाला होता. या सामन्यात सिंधूने झुंजार खेळ करत १६-२१, २१-१६, २१-१९ असा विजय मिळवला होता.

- Advertisement -